महत्वाच्या बातम्या

 राज्यपालांना आदिवासी आमदार शिष्टमंडळाची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : आमदार तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील राजभवन मुंबई येथे नवनियुक्त राज्यपाल Jishnu Dev Varma यांची सदिच्छा भेट घेतली.

या प्रसंगी शिष्टमंडळाच्या वतीने महान आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा राज्यपालांना भेट देण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जनजाती सल्लागार परिषदेच्या नियमित बैठका घेणे, शासकीय विभागांमधील रिक्त पदांची तातडीने भरती करणे तसेच पंचायत (अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार) कायदा, १९९६ (पेसा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे या मुद्द्यांवर शिष्टमंडळाने राज्यपालांचे लक्ष वेधले.

यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपणही आदिवासी समाजातून आलेले असल्यामुळे समाजाच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक त्या चर्चा तसेच प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढील काळात सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





  Print






News - Rajy




Related Photos