महत्वाच्या बातम्या

 मतिमंद बेसहारा महिलेचा विनयभंग : आरोपीला सावलीतून अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल शहरातील नवभारत विद्यालय परिसरात एका मतिमंद व बेसहारा महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधी चौक ते विश्रामगृह मार्गावरील नवभारत विद्यालय परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणारी एक मतिमंद महिला नेहमीप्रमाणे दुकानाच्या शटरजवळ झोपली होती. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ ते २ वाजताच्या दरम्यान एका इसमाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली.

दरम्यान, महिलेच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी बाहेर येताच आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेला. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती मूल पोलिसांना दिली.

माहिती मिळताच मूल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी तसेच महिला उपनिरीक्षक वर्षा नैताम यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपी शेखर कोंडूजी मेश्राम (४०), रा. आंबेडकर चौक, सिंदेवाही याला सावली येथून अटक करण्यात आली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos