TET सक्ती, संचमान्यता व B.L.O. कामांबाबत शिक्षक संघाची शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित व महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने १ मार्च २०२६ रोजी वर्धा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी संघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीत राज्यस्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. शिक्षक पात्रता परीक्षा (TET), संचमान्यता, B.L.O. सह इतर अशैक्षणिक कामांचा वाढता ताण आदी विषयांवर संघाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे -
१. शिक्षण संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत १९ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात आलेले पत्र रद्द करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती देताना संबंधित शिक्षकांनी दोन वर्षांच्या कालावधीत TET उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
२. शिक्षकांकडून घेतली जाणारी B.L.O. (Booth Level Officer) तसेच इतर अशैक्षणिक कामे तात्काळ काढून घेण्यात यावीत. अशा कामांमुळे शैक्षणिक कार्यावर परिणाम होत असल्याचे संघाने निदर्शनास आणून दिले.
३. १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेसंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशीही ठाम मागणी संघाकडून करण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर राज्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष लोमेश व-हाडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम, वर्धा जिल्हाध्यक्ष अरुण झोटींग, वर्धा जिल्हा सरचिटणीस सुनिल कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बटाले यांच्यासह संघाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर संघाकडून लवकरच या मागण्यांवर ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
News - Wardha




Petrol Price




