ना सप्तपदी, ना मंगलाष्टके तर संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ


विदर्भ न्युज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
हल्ली हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. कुणी आकाशात लग्नगाठ बांधतं, कुणी पाण्यात. देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नात सात फेरे घेतले जातात. पण या दोघांनी मात्र असं काही केलं नाही. त्यांनी संविधानाची शपथ घेऊन लग्न केलं. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि अन्य थोर पुरुषांना साक्षी मानून हा विवाह सोहळा पार पडला. मध्य प्रदेशातील खरगोन येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी जोडप्याच्या विवाहाची चर्चा गावागावांत आणि शहरात होत आहे. भगवानपुरा येथील ढाबला गावात आदिवासी युवक इकराम आरसे आणि नाईजा यांचा विवाह 15 जानेवारी रोजी साध्या आणि अनोख्या पद्धतीने पार पडला. लग्नसोहळ्यात नेहमीच्या प्रथा-परंपरांना छेद देण्यात आला. उभयतांनी मंडपात राज्यघटनेची शपथ घेऊन त्याचे आयुष्यभर पालन करण्याचे वचन एकमेकांना दिले. एकमेकांच्या भावनांचा आदर करून साथसंगत करण्याची शपथ घेतली. थोर व्यक्तींचे विचार आचरणात आणताना त्यांचा प्रसार करण्यासाठी दोघे कटिबद्ध झाले. इकराम आरसे हे पोलीस दलात आहेत. ते वर्षभरापूर्वी भोपाळ येथे झालेल्या एका विवाह सोहळ्याला उपस्थित होते. तिथे राज्यघटनेची शपथ घेऊन पार पडलेला विवाह त्यांनी बघितला होता. आपले वैवाहिक जीवन अशाच पद्धतीने सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या भावी पत्नीला ती इच्छा बोलून दाखवली. तीदेखील आनंदाने तयार झाली. या आगळ्यावेगळ्या लग्नाची पूर्ण जिह्यात चर्चा होत आहे.

 
  Print


News - Rajy | Posted : 2021-01-19


Related Photos