बुटीबोरीतील कोका-कोला फ्रँचायझी प्लांटवर आयकर विभागाचा छापा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : उपराजधानी नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी मोठी खळबळ उडाली. आयकर विभागाच्या दिल्लीस्थित विशेष पथकाने जगप्रसिद्ध कोका-कोला शीतपेय कंपनीची फ्रँचायझी असलेल्या सुपीरिअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बुटीबोरी येथील प्लांटवर अचानक छापा टाकला. सकाळी सुरू झालेली ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे संपूर्ण औद्योगिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, या छाप्याचे मुख्य धागेदोरे दिल्लीशी जोडलेले आहेत. कोका-कोला कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असल्याने तसेच काही आर्थिक व्यवहारांमध्ये संशयास्पद बाबी आढळल्यामुळे दिल्लीतील आयकर विभागाच्या रडारवर ही कंपनी आली होती. त्यानंतरच दिल्लीतील विशेष पथक नागपूरमध्ये दाखल झाले. या मोहिमेत आयकर विभागाच्या नागपूर पथकानेही स्थानिक पातळीवर सहकार्य केले.
सुपीरिअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोका-कोला ब्रँडअंतर्गत विविध शीतपेयांची निर्मिती, पॅकेजिंग आणि वितरणाचे काम पाहते. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या मुख्य प्लांटमध्ये मंगळवारी सकाळी आयकर अधिकारी अचानक दाखल झाले. पथकाने कंपनीच्या मागील काही वर्षांतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे तसेच डिजिटल डेटा ताब्यात घेतल्याचे समजते.
सकाळपासून सुरू झालेली ही सर्च मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या काळात प्लांटमधून कोणालाही आत किंवा बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कारवाईचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात -
या कारवाईचे नेमके कारण काय, याबाबत आयकर विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावरील करचोरी किंवा आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील मुख्य कार्यालयाशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासाचा हा एक भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या छाप्यानंतर उद्योगजगतात विविध चर्चांना उधाण आले असून पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Nagpur




Petrol Price




