महत्वाच्या बातम्या

 कुही तालुक्यात कल्पना जिनिंगमध्ये भीषण आग : ८ वर्षीय बालक होरपळला गंभीर जखमी, १५ हजार क्विंटल कापूस जळून राख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कुही/पचखेडी : कुही तालुक्यातील कुही-आंभोरा मार्गावर असलेल्या कल्पना जिनिंग मध्ये गुरुवारी (१२) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये रोहन सुरेश दुधवे (८) नावाच्या बालकाला होरपळून गंभीर जखमी होण्याची घटना घडली आहे. आग लागल्यामुळे किमान १५ हजार क्विंटल कापूस जळून राख झाला असून, या आगीत ११ कोटी ७० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्किटमुळेलागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आग लागल्यानंतर, जिनिंगमध्ये काम सुरू असताना कापसाच्या ढिग्यापर्यंत आग पोहोचली आणि मोठ्या प्रमाणात धूर निघायला लागला. या वेळी कामगारांनी तात्काळ अग्निशमन संयंत्र सुरू करत रोहनला बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली, परंतु तोपर्यंत रोहन होरपळला होता.

घटनास्थळी अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आणि रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणली. आगीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले, पण आग मशीनपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे मशीन, रुईच्या गाठी आणि आतील कापूस थोडक्यात बचावला.

रोहन चे वडील जिनिंगमध्ये कामगार म्हणून काम करतात आणि ते कुटुंबीयांसह जिनिंगच्या परिसरातच राहतात. रोहन रोज कापसाच्या ढिगावर खेळत होता, परंतु आग लागल्यावर त्याला वेळीच बाहेर पडता आले नाही. त्याला त्वरित वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देण्यात आले आणि नंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, पण कल्पना जिनिंग प्रशासनाने तपास सुरू केला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos