महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : तिघे रंगेहात, चौघे पसार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील सुभाष वार्ड परिसरात घराच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत २ हजार ५८० रुपयांची रोख रक्कम आणि ५२ पत्ते जप्त करण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे अन्य चार जण घटनास्थळावरून पसार झाले. ही कारवाई १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये मनोज अर्जुन साहू (५०), रा. भगतसिंग वार्ड, श्रीनू नागेश अंगुरी (२६), रा. सुभाष वार्ड आणि अमित ओमप्रकाश निषाद (१९), रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर यांचा समावेश आहे. तर पोलिसांना पाहून पसार झालेल्यांमध्ये ईसा बहुरिया रा. सुभाष वार्ड,सूरज उर्फ टायगर, सलीम शेख आणि राजू उर्फ बकरी निषाद रा. सुभाष वार्ड बल्लारपूर यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड यांच्या नेतृत्वाखालील पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. यावेळी सुभाष वार्डातील रूपा बहुरिया यांच्या घराच्या मागील बाजूस विजेच्या दिव्याच्या प्रकाशात काही जण गोलाकार बसून ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रत्यक्षात काही जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी घेराव घातला असता पोलिसांची चाहूल लागताच काही जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये, तर जुगाराच्या डावावरून १ हजार ८० रुपये, अशी एकूण २ हजार ५८० रुपयांची रोकड आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे ५२ पत्ते जप्त करण्यात आले.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात पकडण्यात आलेल्या तिघांसह पसार झालेल्या चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos