महत्वाच्या बातम्या

 सी-६०च्या शौर्यगाथेचा गौरव : संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा मुंबईत सन्मान


- चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाचा निर्णायक टप्पा; महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याची घोषणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रातील माओवादविरोधी लढ्याला निर्णायक दिशा देणाऱ्या आणि अवघ्या ६० जवानांपासून सुरू झालेल्या सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी (भा.पो.से., सेवानिवृत्त) यांचा गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गडचिरोली परिक्षेत्रात यापूर्वी सेवा बजावलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला होता.

मे २०२६ मध्ये गडचिरोली जिल्हा सशस्त्र माओवादी कॅडरपासून मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. या निर्णायक टप्प्याची मुहूर्तमेढ सन १९९० मध्ये तत्कालीन गडचिरोली पोलीस अधीक्षक असलेल्या के. पी. रघुवंशी यांनी रोवली होती.

६० जवानांपासून सुरू झालेली शौर्यगाथा -
के. पी. रघुवंशी हे १९८०च्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून, आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विशेष कृती दल, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय यांसारख्या महत्त्वाच्या घटकांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. सन २०१५ मध्ये ते महाराष्ट्र सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झाले.

सन १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस तेलंगणा भागातून सशस्त्र माओवादी दल दक्षिण गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात माओवादी चळवळीचा शिरकाव झाला. सन १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. विरळ प्रशासन, विखुरलेल्या आदिवासी वस्त्या आणि तेंदूपत्ता, बांबू तसेच वनहक्कांसारख्या स्थानिक प्रश्नांचा माओवाद्यांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. गडचिरोलीतील सुमारे ७६ टक्के वनक्षेत्र, दुर्गम भौगोलिक परिस्थिती, रस्त्यांवरील भूसुरुंग व आयईडीचा धोका, भाषेचा अडसर तसेच आंतरराज्यीय सीमेलगत असलेला अबुझमाडचा परिसर यामुळे पारंपरिक पोलीस पद्धतींसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली होती.

याच पार्श्वभूमीवर तत्कालीन गडचिरोली पोलीस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी १ डिसेंबर १९९० रोजी केवळ ६० निवडक जवानांसह सी-६० दलाची स्थापना केली. स्थानिक भूभागाची सखोल माहिती असलेल्या तसेच गोंडी आणि माडिया भाषा जाणणाऱ्या स्थानिक युवकांना दलात सहभागी करून माओवाद्यांचा त्यांच्याच परिचित भूभागात सामना करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. सन १९९४ मध्ये दक्षिण गडचिरोलीसाठी सी-६०ची दुसरी शाखा स्थापन करण्यात आली. कालांतराने हे दल महाराष्ट्राच्या माओवादविरोधी अभियानातील एक महत्त्वाचे विशेष दल म्हणून विकसित झाले.

सी-६०चा विस्तार; अत्याधुनिक साधनांचे पाठबळ -
आज गडचिरोली येथे सी-६०ची २९ पथके आणि ९६१ जवान, तर गोंदिया येथे ९ पथके आणि १६६ जवान कार्यरत आहेत. या दलाला आधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष साधनांचेही पाठबळ मिळत आहे. त्यामध्ये १६४ ड्रोन, ६४ माइन प्रोटेक्टेड व्हेईकल्स (एमपीव्ही), २० बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (बीडीडीएस) पथके आणि १७ श्वान पथकांचा समावेश आहे.

सन २००९-१० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात २ कंपनी, ४ प्लाटून आणि ९ दलमच्या माध्यमातून ३७९ सशस्त्र माओवादी कार्यरत असल्याची नोंद होती. गोंदिया जिल्ह्यातही ५७ माओवादी कार्यरत होते. या तुलनेत आजची परिस्थिती माओवादविरोधी अभियानातील दीर्घकालीन बदल अधोरेखित करणारी असल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.

२४४ पोलिसांचे सर्वोच्च बलिदान; ६०९ नागरिकांचा मृत्यू -
महाराष्ट्रातील माओवादविरोधी संघर्षात आतापर्यंत २४४ पोलीस अधिकारी व जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर माओवादी हिंसाचारात ६०९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. प्रभावी माओवादविरोधी अभियानादरम्यान आतापर्यंत ३६३ माओवादी ठार, ५५८ जणांना अटक, तर ८६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही सांगण्यात आले.

बोरिया-कसनासूर ते वांढोली; निर्णायक चकमकींचा प्रवास -
माओवादविरोधी अभियानातील अनेक चकमकी महत्त्वपूर्ण टप्पे ठरल्या. सन २०१८ मधील बोरिया-कसनासूर चकमकीत ४० माओवादी ठार झाल्याची नोंद आहे. सन २०२१ मधील मर्दिनटोला चकमकीत केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह २७ माओवादी, तर सन २०२४ मधील वांढोली चकमकीत १२ माओवादी ठार झाल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले.

सन २०२६च्या सुरुवातीला फोदेवाडा परिसरातील कारवाईत माओवादी कमांडर प्रभाकर याचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. छत्तीसगड सीमावर्ती भागात जवानांनी तीन दिवस आणि तीन रात्री अभियान राबविल्याची माहिती देण्यात आली. ही कारवाई माओवादीविरोधी अभियानातील महत्त्वाचा निर्णायक टप्पा ठरल्याचे नमूद करण्यात आले.

ऑपरेशन अंतिम प्रहारनंतर माओवादमुक्त महाराष्ट्र -
माओवादविरोधी लढ्याच्या अंतिम टप्प्यात मे २०२६ मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर पाच माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या कारवाईनंतर गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय सशस्त्र माओवादी उपस्थिती संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.

८१९ जणांचा हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहाकडे प्रवास -
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ८१९ सशस्त्र माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती देण्यात आली. डीकेएसझेडसी सदस्य गिरीधर तुमरेटी आणि त्यांची पत्नी ललिता, डीकेएसझेडसी सदस्य तारक्का तसेच माओवादी केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांचे आत्मसमर्पण हे या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे ठरल्याचे सांगण्यात आले.

भूपती याने ६१ साथीदार आणि ५४ अग्नीशस्त्रांसह आत्मसमर्पण केले. त्याचे आत्मसमर्पण देशाच्या माओवादीविरोधी अभियानाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना ठरल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. त्यानंतर देशभरात एकूण १,०७० माओवाद्यांनी ६३७ अग्नीशस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती देण्यात आली.

प्रोजेक्ट संजीवनीतून पुनर्वसन -
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून प्रोजेक्ट संजीवनी राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना १५३ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून, त्यांना पुनर्वसन, कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांवर नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

शौर्याला पुरस्कारांची सलामी -
सी-६० दलातील अधिकारी आणि जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल विविध पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. दलातील अधिकारी व जवानांना आतापर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती शौर्य पदके, ३५८ पोलीस शौर्य पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी २२ राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. सन २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रथमच सी-६० सेवा पदक जाहीर केले. त्याअंतर्गत गडचिरोली पोलीस दलातील ४२५ अधिकारी व जवानांना सी-६० सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

माओवादमुक्तीनंतर विकासाला चालना -
माओवादमुक्तीनंतर गडचिरोलीत शांतता कायमस्वरूपी टिकविण्यासाठी पोलीस दलाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना, भूसुरुंग निकामी करून क्षेत्र स्वच्छता, आत्मसमर्पितांचे पुनर्वसन तसेच नागरिकांचा विश्वास दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान, प्रोजेक्ट उत्थान आणि प्रोजेक्ट कृषी समृद्धी यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून आतापर्यंत १४ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ झाल्याचे सांगण्यात आले. प्रोजेक्ट उडानअंतर्गत १६,३४३ युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी १०,७३० युवकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाचनाची सुविधा मिळावी यासाठी एक गाव, एक वाचनालय उपक्रमांतर्गत ७५ नवीन वाचनालयांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय दुर्गम-अतिदुर्गम ८७ गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा पोहोचली आहे. पोलीस दलाच्या सुरक्षा आणि सहकार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात ४२३ किलोमीटर रस्ते, ६५ पूल आणि ६२८ मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सी-६० हा आपला वारसा; गडचिरोलीतील शांतता हा त्याचा पुरावा -
सन्मान सोहळ्यात पोलीस महासंचालकांनी के. पी. रघुवंशी यांच्या योगदानाचा गौरव केला. सन १९९० मध्ये ६० जवानांपासून सुरू झालेल्या सी-६० दलाने चार दशकांपासून सुरू असलेल्या माओवादाचा अंत केला आहे. सी-६० हा आपला वारसा असून गडचिरोलीतील शांतता हा त्याचा पुरावा आहे, अशा शब्दांत त्यांनी रघुवंशी यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी के. पी. रघुवंशी यांनी मांडलेली संकल्पना पुढे नेणारे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी, जवान आणि सी-६० पार्टी कमांडर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. तसेच माओवादविरोधी लढ्यात खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या सीआरपीएफ आणि एसआरपीएफ दलाच्या जवानांच्या भूमिकेचाही गौरव करण्यात आला. या संघर्षात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या २४४ शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

माजी अधिकाऱ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी -
कार्यक्रमादरम्यान गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सी-६० दलाच्या उल्लेखनीय कामगिरीचा, दलाला प्राप्त झालेल्या शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पुरस्कारांचा तसेच अधिकारी आणि जवानांनी बजावलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. गडचिरोली परिक्षेत्रात यापूर्वी सेवा बजावलेल्या काही माजी पोलीस अधीक्षकांनीही सी-६०च्या वाटचालीतील आपल्या अनुभवांना उजाळा दिला. त्यांनी त्या काळातील आठवणी आणि माओवादविरोधी अभियानातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. अवघ्या ६० जवानांपासून १९९० मध्ये सुरू झालेला सी-६०चा प्रवास आणि २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली ही वाटचाल महाराष्ट्राच्या माओवादविरोधी अभियानातील महत्त्वपूर्ण अध्याय ठरली आहे. या प्रवासाचे शिल्पकार असलेल्या के. पी. रघुवंशी यांच्या सन्मानाने सी-६०च्या चार दशकांच्या शौर्यगाथेलाही मानाचा मुजरा करण्यात आला.





  Print






Related Photos