२३ व्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय वुशु निवड चाचणी स्पर्धेसाठी अर्ज आमंत्रित


- ३० नोव्हेंबरला नागपूर येथे स्पर्धा; प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी २३ व्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय वुशु (मुले व मुली) निवड चाचणी स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांच्या आदेशानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड चाचणी स्पर्धा सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, कोराडी, नागपूर येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील सब-ज्युनिअर गटातील गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, विविध खेळ व वजनी गटांतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या नियोजनानुसार सहभागी संघ, खेळाडू आणि पंचांनी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत खेळाडूंचे वजन आणि तांत्रिक समितीची बैठक होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११.३० वाजता चिठ्ठीद्वारे (ड्रॉ-लॉट्स) स्पर्धेचे सामने निश्चित केले जाणार आहेत.
सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सकाळी ११.३० वाजेपासून प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात होईल. यामध्ये सांशू (सांडा) आणि ताओलू (पारंपरिक कुंग-फू) या दोन्ही क्रीडा प्रकारांतील सामने खेळविण्यात येणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार असून त्यानंतर सहभागी संघ रवाना होतील.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी -
या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतील प्रत्येक खेळ प्रकार आणि वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंची २६ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर वुशु (मुले व मुली) अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड केली जाणार आहे. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी खेळाडूंना उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी स्वप्निल बनसोड (मो. ९८२२६८२६३९२) आणि नागपूर जिल्हा वुशु असोसिएशनचे सचिव दीपक भिसेन (मो. ९९२१८५९२१५) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेता येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र खेळाडूंनी या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होऊन आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करावे आणि राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.




Petrol Price




