सोलर बसविण्याच्या नावाखाली ३.९२ लाखांची फसवणूक : आरोपीवर गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / यवतमाळ : घरावर सोलर यंत्रणा बसवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाकडून तीन लाख ९२ हजार रुपयांची आगाऊ रक्कम घेऊनही वर्षभर काम न करता फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील रामधन चव्हाण (रा. बंजारा कॉलनी, पुसद) यांनी आपल्या घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी संबंधित व्यक्तीशी व्यवहार केला होता. त्यानुसार त्यांनी सुनील विश्वेश्वर टाके (रा. मलकापूर, जि. बुलडाणा) याला तीन लाख ९२ हजार रुपयांची आगाऊ रक्कम दिली. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपीने सोलर बसविण्याचे काम केले नाही.
वर्ष उलटूनही काम न झाल्याने तसेच वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपीकडून टाळाटाळ सुरू राहिल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील चव्हाण यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तक्रारीच्या आधारे २९ जानेवारी रोजी सुनील विश्वेश्वर टाके याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे सोलर बसविण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अशा व्यवहारात दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
News - World




Petrol Price




