राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार : संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी विधान भवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी लक्षात घेता, विधिमंडळ गटनेतेपद दीर्घकाळ रिक्त ठेवणे योग्य नसल्याने पक्षाने तातडीने हा निर्णय घेतला.
अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाबाबत हालचालींना वेग आला होता. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांकडून होत होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा बारामतीहून सुनेत्रा पवार व जय पवार मुंबईकडे रवाना झाले.
शनिवारी सकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याच ठिकाणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जनभावना आणि सद्य राजकीय परिस्थितीचा विचार करून सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सर्व नेते विधान भवनात दाखल झाले.
विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात सर्वप्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांची अधिकृत बैठक सुरू झाली. या बैठकीसाठी पक्षाचे विधानसभा व विधान परिषदेचे आमदार उपस्थित होते. तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल पटेल यांचीही उपस्थिती होती.
विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी सूचक म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर दोन आमदारांनी त्यास अनुमोदन दिले. कोणताही विरोध न होता सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संबंधित पत्र विधिमंडळ सचिवांसह मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे.
विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडणे, व्हिप जारी करणे तसेच शासकीय कामकाजात पक्षाची दिशा ठरवण्याचे अधिकार गटनेत्याकडे असतात. त्यामुळे या पदावर सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण विधिमंडळीय नेतृत्व त्यांच्या हाती आले आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून निवडल्या जाणार असल्याची चर्चा असून, संध्याकाळी लोकभवनात साध्या पद्धतीने शपथविधी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. त्याआधी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
पुढील सहा महिन्यांत पोटनिवडणुकीत विजयी होऊन विधिमंडळ सदस्य बनणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा, धोरण आणि वाटचाल सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कशी आकार घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
News - Rajy




Petrol Price




