महत्वाच्या बातम्या

 कोरचीत भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक : ४७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


- पेट्रोल पंपासमोर रविवार सकाळी अपघात; धडकेनंतर ट्रकचालक पसार, बेडगाव पोलिसांच्या नाकाबंदीत ट्रक पकडला, चालक ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची-कुरखेडा राज्य महामार्गावर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ४७ वर्षीय दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोरची येथील पेट्रोल पंपासमोर घडली. सुंदरसिंग तुलाराम पुडो ४७ वर्ष, रा. भीमपूर, ता. कोरची असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, कोरची पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बेडगाव पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक पकडला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरसिंग पुडो हे दुचाकीने पेट्रोल पंपावरून आपल्या भीमपूर गावाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी छत्तीसगड राज्यातून बोटेकसा मार्गे महाराष्ट्रात आलेला सीजी १२ बीडी ८८१२ क्रमांकाचा मालवाहू ट्रक कुरखेड्याकडे जात होता. कोरची पेट्रोल पंपासमोर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुडो यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पुडो यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी तातडीने बेडगाव पोलीस मदत केंद्राला माहिती दिली. त्यानुसार बेडगाव पोलिसांनी संबंधित मार्गावर नाकाबंदी करून पसार होणाऱ्या ट्रकला पकडले. त्यानंतर ट्रक व चालकाला पुढील कारवाईसाठी कोरची पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हा अपघात कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कोरची पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

महामार्गावर वेगाचा कहर; गतिरोधक नसल्याने अपघातांचा धोका -
कोरची शहरातून जाणाऱ्या कोरची-कुरखेडा राज्य महामार्गावर अवजड वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. छत्तीसगडमधील बोटेकसा मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांसाठी कोरचीपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खडतर असून, या मार्गाचे बांधकामही अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, कोरचीपासून पुढे डांबरीकरण झालेल्या महामार्गावर आल्यानंतर काही अवजड वाहनचालक वेगाने वाहने चालवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच पेट्रोल पंप, बाजारपेठ आणि नागरी वस्ती परिसरात अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महामार्गावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक, वेगमर्यादेचे फलक आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. सुंदरसिंग पुडो यांच्या मृत्यूमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





  Print






Related Photos