महत्वाच्या बातम्या

 महावितरणमध्ये २७ हजार ६७५ पदे रिक्त : कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण, ग्राहक सेवेवर परिणाम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सांगली : आशिया खंडातील वीज वितरण क्षेत्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक कंपनी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) सध्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. राज्यभरात तब्बल २७ हजार ६७५ पदे रिक्त असल्याने प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत असून, त्याचा विपरीत परिणाम वीजपुरवठा, तक्रार निवारण तसेच वीजबिल थकबाकी वसुलीवर होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

महावितरणमध्ये राज्यात एकूण ८१ हजार ४६८ मंजूर पदे आहेत. मात्र, सध्या केवळ ५४ हजार ७५७ कर्मचारी कार्यरत असून उर्वरित पदे रिक्त आहेत. या परिस्थितीमुळे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविताना अडचणी येत असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. वाढत्या कामाच्या ताणामुळे कर्मचारी मर्यादेपलीकडे काम करत असून, त्यामुळे सेवांची गुणवत्ता आणि वेळेवर प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होत असल्याचे चित्र आहे.

राज्यातील तीन कोटी १७ लाखांहून अधिक कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. सोलर कृषी पंप बसविण्याचा जागतिक विक्रम तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार महावितरणच्या नावावर असले, तरी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळाची संख्या अपुरी पडत असल्याने या यशाला तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तांत्रिक संवर्गातील स्थिती गंभीर -
तांत्रिक संवर्गात मंजूर असलेल्या ४५ हजार ८०३ पदांपैकी १८ हजार ५०६ पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्य तंत्रज्ञांची १९९, प्रधान तंत्रज्ञांची ९१२, वरिष्ठ तंत्रज्ञांची ६,६०१ तसेच तंत्रज्ञांची १२,३१३ पदे रिक्त आहेत. अलीकडे तंत्रज्ञ प्रवर्गात १,५१६ विद्युत सहायकांची भरती करण्यात आली असली, तरी ती एकूण गरजेच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. यंत्रचालक संवर्गातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून कामाचा ताण अधिक वाढला आहे.

याशिवाय पदोन्नती व सरळसेवा भरतीतील १५ हजार ५२६ मंजूर पदांपैकी ५,६२१ पदे रिक्त आहेत. अभियंता प्रवर्गात ६३३ पदे रिक्त असून लेखा, आयटी, कामगार, सुरक्षा, कायदेविषयक आदी विभागांमध्ये मिळून २,९१५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा थेट परिणाम ग्राहक सेवा, प्रशासकीय कामकाज आणि नियोजनावर होत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

रिक्त पदे भरा, कर्मचाऱ्यांचा ताण कमी करा : मोहन शर्मा -
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा आणि सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी महावितरणमधील २७ हजार ६७५ रिक्त पदे तातडीने भरण्याची जोरदार मागणी केली आहे. रिक्त पदांमुळे वीजबिलांची थकबाकी वाढत असून ग्राहक सेवेची पातळीही खालावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महावितरणची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ भरतीचा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भरती प्रक्रिया राबवून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अशी आहेत प्रमुख रिक्त पदे -
- तांत्रिक संवर्ग : १८,५०६
- यंत्रचालक संवर्ग : ५,६२१
- लेखा विभागासह अन्य कर्मचारी : २,९१५
- अभियंता संवर्ग : ६३३





  Print






News - World




Related Photos