महत्वाच्या बातम्या

 प्रेमसंबंध संपल्यानंतरही तरुणीचा छळ : मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणारा युवक अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतरही एका तरुणीचा सातत्याने पाठलाग करून तिला मानसिक त्रास देणे, धमकावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बल्लारपूर येथील २० वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण दिलीप आमटे (वय २२), रा. बल्लारपूर याच्याविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपी व पीडित तरुणी यांची सन २०२२ मध्ये ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि जानेवारी २०२४ पासून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, वारंवार होणाऱ्या वादांमुळे तरुणीने मार्च २०२६ मध्ये आरोपीशी सर्व संबंध तोडून आई-वडिलांच्या घरी राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने आरोपीशी सर्व संपर्क बंद केला होता.

मात्र, संबंध संपुष्टात आल्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग करणे, विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, धमक्या देणे तसेच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरूच ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तक्रारदार तरुणीला स्वतःच्या जीविताची भीती वाटू लागली होती.

दरम्यान, २३ जून रोजी बल्लारपूर येथील एका विवाह समारंभात पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत बोलत असताना आरोपी तेथे पोहोचला. संतापाच्या भरात आरोपीने तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच तिच्या गालावर दोन थपडा मारून तुला मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला.

या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos