महत्वाच्या बातम्या

 फुलचूर येथे घरफोडी : ४ चोरट्यांकडून १.८६ लाखांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजतापासून १९ जानेवारी रोजी पहाटे ४.१५ वाजेच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ५१, रा. घर क्रमांक ३८, आशीर्वाद कॉलनी, फुलचूर) या घराबाहेर असताना चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील बेडरूममधील कपाट उघडून त्यातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला.

या घरफोडीत कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोख रक्कम, चांदीचा एक जग, सात चांदीचे ग्लास व देवाची मूर्ती असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज, सोन्याच्या दोन अंगठ्या (किंमत सुमारे ७० हजार रुपये), मनगटी घड्याळ (५ हजार रुपये) तसेच संगणकाचे पावर सप्लाय युनिट (१ हजार ५०० रुपये) असा एकूण १ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भान्यासं) २०२३ अंतर्गत कलम ३३१ (४), ३०५ (ए), ३ (५) अन्वये चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos