महत्वाच्या बातम्या

 अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर चंद्रपूर शहर पोलिसांचा कडक प्रहार : महाकाली कॉलरीत ८६७ लिटर मोहा दारू व सडवा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील महाकाली कॉलरी परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर चंद्रपूर शहर पोलिसांनी कडक प्रहार करत मोठ्या प्रमाणात मोहा दारू व सडवा जप्त केला. या कारवाईत तब्बल ८६७ लिटर मोहा दारू व सडवा तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, तीन महिलांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केला आहे.

पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २ जून रोजी महाकाली कॉलरी येथील आनंदनगर परिसरातील तीन ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत २६७ लिटर मोहा गावठी दारू, ६०० लिटर मोहा फुलांचा सडवा आणि इतर साहित्य असा एकूण ५६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध दारू निर्मिती व विक्रीमुळे सामाजिक तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेला सडवा नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोहवा संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, मपोहवा. भावना रामटेके, पोअं सुशांत घिवे, दिपीका झिंगरे यांनी केले.

अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा चंद्रपूर शहर पोलिसांनी दिला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos