कारागृहातील बंद्यांसाठी कृषी उद्यमी प्रशिक्षण आर्थिक विकासाचे प्रभावी माध्यम : अधीक्षक सुभाष सोनावणे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कारागृहातील बंद्यांनी भूतकाळातील चुकांमधून योग्य बोध घेऊन भविष्यात स्वावलंबी व सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. कृषी उद्यमी प्रशिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून आर्थिक विकासाचे प्रभावी माध्यम आहे. या प्रशिक्षणातून प्राप्त झालेले कौशल्य आणि ज्ञानाचा उपयोग करून आपला आर्थिक स्तर उंचावावा, असे प्रतिपादन खुले कारागृह, गडचिरोलीचे अधीक्षक सुभाष सोनावणे यांनी केले.
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि बँक ऑफ इंडिया संचालित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), गडचिरोली यांच्या वतीने कारागृहातील बंद्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्यमी प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी आरसेटीचे संचालक नागेश आष्टीकर, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर, आरसेटी श्रेष्ठता केंद्राचे प्रतिनिधी पुंडलिक काटकर आणि कपिल चावरे यांच्यासह कारागृहातील प्रशिक्षणार्थी बंदी उपस्थित होते.
माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेले हे १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण बंद्यांच्या कौशल्य विकास, स्वयंरोजगार निर्मिती आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले. प्रशिक्षणादरम्यान कृषी उद्योजकता, शेतीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, आर्थिक नियोजन तसेच उद्यमशीलतेचे विविध पैलू यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
समारोप कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी उरकुडा धानोरकर आणि जितेंद्र शेतपल्लीवार यांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणाचा आढावा घेतला. या प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्रातील विविध व्यवसाय संधींबाबत माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी भविष्यात या ज्ञानाचा उपयोग करून स्वावलंबी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राजेंद्र वंजारे आणि सूचित लाकडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षणार्थींना कृषी व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्योजकतेच्या संधी आणि आर्थिक सक्षमीकरणाचे विविध मार्ग समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन पुरुषोत्तम कुनघाडकर यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कारागृहातील बंद्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
News - Gadchiroli




Petrol Price




