कोविड १९ लसिकरणाची उद्या रंगीत तालीम : ड्राय रनसाठी भंडारा जिल्हा सज्ज


- तीन ठिकाणी होणार ड्राय रन, ७५ व्यक्तींचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
कोरोना प्रतीबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी जिल्हा रूग्णालय भंडारा, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे उद्या  शुक्रवार 8 जानेवारी 2021 रोजी कोविड 19 लसिकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) आयोजित केली आहे. ड्राय रनसाठी भंडारा जिल्हा सज्ज झाला असून जिल्हा रूग्णालय भंडारा, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे प्रत्येकी 25 अशा एकूण 75 लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे. रंगीत तालीममध्ये लस न देता लसीकरणासाठीची संपूर्ण प्रक्रीया राबविली जाणार आहे.
लसीकरणासाठी पहिल्या टप्यात 7 हजार 608 हेल्थ केअर वर्करला लस दिली जाणार आहे. लाभार्थ्यांची को-विन ॲपवर नोंदणी झाली आहे. शासकीयसह खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. लसीकरणाची पुर्व तयारी म्हणून जिल्हा रूग्णालय भंडारा, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथील आरोग्य क्रेंदात ड्राय रन केले जाणार आहे. ड्राय रन मधील लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी पोटलवर त्यांची माहिती अपलोड करणे, लस दिल्यानंतरची नोंद घेणे व पुढील 30 मिनीटे आरोग्य कक्षात निरीक्षण करणे अशी रंगीत तालीम होणार आहे.

असे असणार ड्राय रन

सकाळी 9 ते 12 वाजताच्या दम्यान ड्राय रन होईल, 25 जणांनमधून प्रत्येकाला ठरलेल्या वेळेत बोलाविले जाईल, केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा वाहन परवाना (यापैकी एक) याची मदत घेतल्या जाईल, ओळख पटल्यावर ड्राय रन टेस्ट पोर्टलवर संबंधीत व्यक्तींची नोंद घेतल्या जाईल, लसीचा डोज देण्याच्या कक्षात पाठविले जाईल, लस मिळाल्याच्या माहितीची नोंद घेतली जाईल, पुढील 30 मिनीटे निरीक्षण कक्षात बसवून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत ठेवले जाईल

कोरोना लसीकरण चार महत्वपूर्ण संदेश

आज आपणास कोरोनाची लस देण्यात आली आहे व ही लस आपले कोरोना आजारापासून संरक्षण करेल
लस घेतल्यानंतर कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्याच्या पध्दती जसे की, मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सहा फुटांचे शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक असेल
लसीकरणानंतर आपणास काही त्रास जाणवल्यास आपण आपल्या ए.एन.एम., आशा कार्यकर्ती, जवळच्या आरोग्य केंद्र किंवा कोरोना कंट्रोल रूमशी  संपर्क साधावा
पुढील डोसची तारीख, वेळ व ठिकाण आपणास आपल्या मोबाईल एस.एम.एस. व्दारे कळविण्यात येईल
कोविड 19 च्या लसिकरणाची रंगीत तालीम जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांच्या मागदर्शना खाली आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.
  Print


News - Bhandara | Posted : 2021-01-07


Related Photos