कासीबुग्गा येथे भीषण दुर्घटना : आठ महिला व एका अल्पवयीन मुलाचा बळी, अनेक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कासीबुग्गा (आंध्र प्रदेश) : श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये आठ महिला व एका १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळी सुमारे ११.३० वाजता ही दुर्घटना घडली. श्रीकाकुलम जिल्हाधिकारी स्वप्निल पुंडकर यांनी सुरुवातीला मृतांचा आकडा दहा असल्याचे सांगितले होते, मात्र अधिकृत आकडा नऊवर स्थिरावला. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेलिंग कोसळल्याने उडाली घबराट -
श्रीकाकुलमचे पोलिस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी ही घटना चेंगराचेंगरी नव्हे, तर रेलिंग कोसळल्याने झाल्याचे सांगितले. मंदिराच्या पायऱ्यांजवळील लोखंडी रेलिंग कोसळल्यामुळे भक्तांमध्ये घबराट उडाली. काही जण खाली पडले आणि त्यांच्या अंगावर इतर भक्त पडले, त्यातून नऊ जणांचा मृत्यू झाला, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. मंदिराचे व्यवस्थापन निष्काळजी राहिल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला.
वेंकटेश्वर मंदिर हे खासगी असून नुकतेच बांधण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, या धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिर व्यवस्थापनाने बंदोबस्तासाठी परवानगी घेतलेली नव्हती.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत -
या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीदेखील या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
कार्तिक मास, एकादशीमुळे वाढली भक्तांची गर्दी -
राज्याच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी सांगितले की, शनिवारी कार्तिक मास आणि एकादशीचा योग आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात दाखल झाले होते. प्रत्येक शनिवारी साधारणपणे दोन हजार भक्त दर्शनासाठी येतात, परंतु यावेळी गर्दी अनियंत्रित झाली आणि रेलिंग तुटल्याने दुर्घटना घडली.
धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह-
२०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवर झालेल्या अशा घटनांमध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू व १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जानेवारीत तिरुपतीतील बैरागी पट्टाडा येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता. कासीबुग्गा येथील ही घटना पुन्हा एकदा मंदिर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा पर्दाफाश करणारी ठरली आहे.
News - World




Petrol Price




