महत्वाच्या बातम्या

 मौद्यात अवैध फटाके कारखान्यावर पोलिसांची धाड : कंपनी सील, दोन अटक


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मौदा-रामटेक मार्गालगत असलेल्या महामाया अॅग्रो या द्रोण तयार करणाऱ्या कंपनीत गुपचूप फटाक्यांची निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (१९) छापा टाकून कंपनी सील केली. यावेळी दोन जणांना अटक करण्यात आली असून कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्यांची नावे - कैलास गुलाबचंद अग्रवाल (५५, रा. अग्रेसन चौक, नागपूर) व मिलिंद चंदू ठाकरे (३४, रा. वडोदा, ता. कामठी, जि. नागपूर) अशी आहेत. तपासादरम्यान कंपनीकडे फटाके निर्मितीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांनी सावनेर पोलिसांसह केलेल्या पाहणीत कच्चे व पक्के फटाके, सुतळी बॉम्ब, रसायने, पॅकिंग साहित्य, तयार करण्याच्या मशीनसह मोठ्या प्रमाणावर साहित्य आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आतले सर्व साहित्य जप्त करून कंपनी सील केली.

या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपींवर स्फोटक अधिनियम १८८४, स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ तसेच बीएनएसच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्यांना सोमवार ( २२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोटींचा मुद्देमाल जप्त -
कारवाईत १ कोटी ७ लाख १६ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला. यात तयार व अपूर्ण फटाके, रसायने, कच्चा माल, पॅकिंग बॉक्स, दोन वाहने, मोबाईल फोन आदींचा समावेश आहे.

मोठी दुर्घटना टळली -
ही कंपनी नागरी वस्तीला लागून असल्याने तेथील स्फोटक पदार्थ व रसायनांमुळे मोठा अपघात घडू शकला असता, असा इशारा पोलिसांनी दिला. कंपनीचे मालक कैलास अग्रवाल, मिलिंद ठाकरे व दीपककुमार (फिरोझाबाद, उत्तर प्रदेश) असल्याचे समोर आले असून दीपककुमार यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos