इस्रायलचे सहा इस्लामिक देशांवर हल्ले : २०० ठार, १ हजाराहून अधिक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / इस्रायल : इस्रायलने मागील ७२ तासांत गाजा, सीरिया, लेबनान, कतार, यमन आणि ट्यूनिशिया या सहा इस्लामिक देशांवर प्रचंड हल्ले चढवले. या हल्ल्यांत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवार ते बुधवार दरम्यान झालेले हे हल्ले दहशतवादी तळांना लक्ष्य करीत करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
इस्रायलने कतारची राजधानी दोहामध्ये हमास नेत्यांवर हवाई हल्ला करून हमास प्रमुख खलील अल हय्या याला टार्गेट केले. या कारवाईत त्याचा मुलगा, ऑफिस डायरेक्टर आणि सुरक्षा रक्षकांसह सहा जण ठार झाले. हमासचे नेते अमेरिकेसोबत युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करत असतानाच ही कारवाई झाल्याने हमासने आता युद्धविराम नाकारला आहे.
लेबनानच्या पूर्वेकडील बेका व हरमेल जिल्ह्यात इस्रायली हवाई हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांत हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०२४ मध्ये युद्धविराम झाल्यानंतरही लेबनानच्या दक्षिणेकडे इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले आहेत.
दरम्यान, इस्रायलने सीरियातील एअरफोर्स बेस आणि सैन्य तळांवरही हल्ले केले. मानवी हक्क संघटनांच्या माहितीनुसार, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इस्रायलने यावर्षी सीरियावर ८६ हवाई आणि ११ जमिनीवरील हल्ले करून १३१ ठिकाणे उद्ध्वस्त केली असून ६१ लोकांना जीव गमवावा लागला आहे.
ट्यूनिशियातील पोर्टवर फॅमिली बोटवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात सहा प्रवासी थोडक्यात बचावले. याशिवाय ब्रिटनचा झेंडा असलेल्या जहाजावरही मंगळवारी हल्ला झाला. यमनची राजधानी सना येथे मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा हवाई कारवाई करण्यात आली.
हुती ठिकाणांना लक्ष्य करताना २८ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात हुती पंतप्रधान अहमद अल रहावी यांच्यासह १० जण ठार, तर ९० पेक्षा अधिक जखमी झाले होते. गाजामध्ये सोमवारी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांत सर्वाधिक १५० लोकांचा मृत्यू झाला असून ५४० हून अधिक नागरिक जखमी झालेत. गाजाचा ७५ टक्क्यांहून अधिक भाग इस्त्रायलच्या ताब्यात गेल्याचे वृत्त आहे.
News - World




Petrol Price




