करुळ घाटात दरड कोसळली : वाहतूक ठप्प, गणेशभक्त अडचणीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / वैभववाडी (सिंधुदुर्ग) : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात गुरुवारी (ता. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे करुळ घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला असून वाहतूक भुईबावडा तसेच फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
दरड हटविण्याचे काम सुरू झाले असले तरी दरडीत मोठ्या प्रमाणात दगड असल्यामुळे दिवसभर वाहतूक ठप्प राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परतीच्या प्रवासात असलेल्या गणेशभक्तांना याचा मोठा फटका बसला आहे.तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असून घाट परिसरात अतिवृष्टीमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सकाळी घाटाच्या माथ्यावरील कड्याचा मोठा भाग कोसळल्याने तब्बल ५० ते ६० फूट रस्ता दरडीखाली गेला आहे.
दरडीमध्ये असलेले प्रचंड दगड हटविण्यासाठी ब्रेकरचा वापर केला जात असून, दाट धुक्यामुळे अडचणी अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे करुळ घाटमार्गावरील वाहतूक सायंकाळी उशिरा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
News - World




Petrol Price




