रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला : १४ जणांचा मृत्यू, ४८ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / रशिया : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया - युक्रेन युद्धात पुन्हा एकदा तीव्रता दिसून आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या जागतिक नेत्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे अधूनमधून होणारे हल्ले सुरूच आहेत.
राजधानी कीववर रशियाचा मोठा हल्ला -
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील युरोपियन युनियन प्रतिनिधी भवनावर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात १४ नागरिकांचा मृत्य झाला असून, ४८ जखमी झाले आहेत. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी सांगितले की, या हल्ल्यात युरोपियन युनियनच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
झेलेन्स्कींची प्रतिक्रिया – तीन मुलांचा बळी -
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. त्यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले की, या हल्ल्याचा निषेध केवळ युरोपियन युनियनकडूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून होणे आवश्यक आहे.
रशिया युद्ध संपवण्याच्या भूमिकेत नाही -
युरोपियन युनियनचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनीही हल्ल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की, रशिया युद्ध थांबवण्याऐवजी नवे हल्ले करत आहे. या हल्ल्यामुळे कीवमधील डझनभर इमारतींना फटका बसला असून, त्यात युरोपियन युनियन प्रतिनिधी मंडळाची इमारतही आहे. जगाने आता एकत्रित आणि ठोस पावले उचलण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले.
एका रात्रीत ६२९ क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ले -
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दावा केला की, एका रात्रीत रशियाने ६२९ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन युक्रेनवर डागले. यात मुलांसह डझनभर नागरिक ठार झाले. निवासी भाग आणि नागरी पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, ही शांतीची संकल्पना नसून, दहशतवादी कृत्य आहे. फ्रान्सने या क्रूर हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
News - World




Petrol Price




