महत्वाच्या बातम्या

 मंडी जिल्ह्यात ढगफुटीचा कहर : गाव उद्ध्वस्त, अन्न-औषधांचा तुटवडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / हिमाचल प्रदेश : मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मंडीपासून अवघ्या ५० किमी अंतरावर असलेल्या चौहार खोऱ्यात रविवारी मध्यरात्री ३ वाजता आरंग नाल्यात आलेल्या पुरामुळे सानवड गावात मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि लोक घाबरून घराबाहेर धावले. स्थानिक जितेंद्र कुमार ठाकूर यांची चार दुकानं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून दोन ते अडीच लाखांचा माल वाहून गेला. केवळ चार तासांत सर्व काही उद्ध्वस्त झालं, असे त्यांनी दुःख व्यक्त केले.

या पूरप्रकोपात १० फूटब्रिज, तीन दुकानं, दोन घरं, दोन गोठे, दोन कार आणि एक सायकल वाहून गेली. सरकारी शाळेत पाणी शिरून भिंत कोसळली. घटनेला पाच दिवस उलटून गेले असले तरी गावात अजूनही अन्न व औषधांचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. गावात पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने मदतकार्य ठप्प झाले आहे.

गावकरी मणिराम यांनी हताश होऊन सांगितले, आता घरच राहिलेलं नाही, आम्ही कुठे जाणार? अन्नाचीही व्यवस्था नाही. तर रेश्मी देवींचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे : सात जणांचं कुटुंब, चार लहान मुलं आहेत.  घर नाही, पावसामुळे उत्पन्न नाही, औषधं मिळत नाहीत, जगायचं तरी कसं?

सध्या मंडी जिल्ह्यातील परिस्थिती अजूनही धोकादायक असून, गावकरी जीव मुठीत घेऊन तग धरून आहेत. गावकऱ्यांची एकच अपेक्षा – लवकरात लवकर मदत मिळावी आणि आयुष्य पुन्हा रुळावर यावं.





  Print






News - World




Related Photos