महत्वाच्या बातम्या

 इटियाडोह प्रकल्प अखेर ओव्हरफ्लो : पर्यटकांची उसळली गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलप्रकल्प मागील अनेक दिवसांपासून ओव्हरफ्लो होण्याच्या प्रतिक्षेत होता. अखेर रविवारी १७ ऑगस्ट दुपारी ३ वाजताच्या मुहूर्तावर प्रकल्पातून पाणी ओसंडून वाहू लागले, आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याची प्रतिक्षा संपली.

शनिवारी तालुक्यात व प्रकल्प परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे ओव्हरफ्लोची शक्यता वर्तविण्यात आली होती. ३८१.५८७ एमएमक्यू क्षमतेचा हा जलप्रकल्प दरवर्षी भरतोच असे नाही, मात्र यंदा जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे तो ९९ टक्क्यांपर्यंत भरलेला होता.

विभागाचा अंदाज खरा ठरला -
बाघ-इटियाडोह सिंचन विभागाकडून शनिवारीच अंदाज व्यक्त करण्यात आला होता की प्रकल्प १०० टक्के भरला असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे हा अंदाज रविवारी दुपारी बरोबर सिद्ध ठरला.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा -
प्रकल्पातून पाणी ओसंडून वाहू लागल्यामुळे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात प्रवेश टाळावा, शेतीची अवजारे व जनावरे दूर ठेवावीत, ओव्हरफ्लो विसर्ग अनिश्चित असू शकतो, त्यामुळे सांडव्याजवळ जाऊ नये. 

पर्यटकांसाठी पर्वणी -
इटियाडोह प्रकल्पाचा ओव्हरफ्लो हे एक विहंगम दृश्य असून, दरवर्षी ही संधी सगळ्यांना मिळत नाही. यंदा तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये पर्यटकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आता प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या अधिकच वाढण्याची शक्यता आहे.





  Print






News - Gondia




Related Photos