कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी तालुक्यातील डोंगरगाव सुंदरी गावात बुधवारी (३०) सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन अंताराम वारई (४७) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.
गजानन वारई हे मागील काही वर्षांपासून शेती करत होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार पिकांचे नुकसान होत होते. परिणामी, उत्पन्नात घट होऊन कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला. या आर्थिक विवंचनेतून ते मानसिक तणावात राहत होते. मंगळवारी (२९) दुपारी ते घरातून बाहेर गेले. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी गावात व शेजारच्या परिसरात शोध घेतला, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.
बुधवारी (३०) पहाटे काही गावकरी शिवारात गेले असता त्यांना झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गजानन वारई यांचा मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुटुंबीयांना व चिचगड पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.
गजानन वारई यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीची आणि शासनाच्या अपयशाची जळजळीत साक्ष आहे.
शासकीय मदतीची मागणी -
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाने तातडीने वारई कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
News - Gondia




Petrol Price




