महत्वाच्या बातम्या

 बेफाम वेगाचा बळी : ट्रकखाली वृद्धाचा मृत्यू, तर स्कॉर्पिओच्या धडकेत दोन वाहने उलटली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील रस्त्यांवर भरधाव वाहनांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गडचांदूर आणि नागभीड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन भीषण अपघातांत एका वृद्धाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गडचांदूरजवळील चटप कॉलनी येथील रहिवासी राजम लचमा सोयाम (६५) हे शनिवारी पहाटे आपल्या मोठ्या मुलासह बीबी रोड परिसरात गेले होते. शौच उरकून दोघेही घरी परतत असताना मागून वेगाने आलेल्या एपी-०५-टीडी-१०३४ क्रमांकाच्या ट्रकने राजम सोयाम यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सोयाम यांना तातडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मृतकाचा मुलगा नंदकिशोर सोयाम यांच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध ‘हिट अँड रन’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, दुसरी घटना नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील कपडा व्यापारी अमोल संतोष हरणे (२९) हे भाऊ आकाश हरणे (३२) आणि मित्र नंदकिशोर कोवे यांच्यासह नागपूरहून खरेदी करून परतत होते. प्रवासादरम्यान मित्राला लघुशंकेसाठी थांबावे लागल्याने त्यांनी एमएच-३३-एसी-७१११ क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला उभी केली.

याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच-२७-बीव्ही-५७९४ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली. अपघातात अमोल हरणे हे चालकाच्या सीटमध्ये अडकून गंभीर जखमी झाले. त्यांच्या सोबत्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना वाहनाबाहेर काढले. माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेप्रकरणी अमोल हरणे यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी अज्ञात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos