चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले विरुद्ध १५ हजार रुपये लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
मुदतीपूर्व सुटका झालेल्या आरोपीचे कागदपत्र आणि पत्ता देण्यासाठी २५ हजारांची लाच मागीतल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार   कोळसा व्यापारी असून त्यांना व्हॅलेंटाईन पुजारा नामक व्यक्तीने कोळशाचे बिलापोटी दिलेला  धनादेश  बाउन्स झाल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.  सदर व्यक्ती चंद्रपूर  जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्याची मुदतीपूर्वी सुटका झाली आहे. सदर व्यक्तीस बासुलीबाबतचे न्यायालयाचे समन्स बजावणे आवश्यक असल्याने तक्रारदाराने  जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथील कारागृह अधीक्षक ढोले  यांना अर्ज देऊन सदर आरोपीबाबत कागदपत्रे तसेच पत्ता मिळण्याकरिता भेटले असता त्यांनी व्हॅलेंटाईन पुजारा याचे कागदपत्रे तसेच पत्ता देण्याकरिता २५ हजार रु. लाचेची मागणी केली. तक्रारदारास भाईदास नामदेव ढोले यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार नोंदविली. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्र्पुर तर्फे ११ ऑक्टोबर रोजी लाच मागणी संबंधाने पडताळणी करण्यात आली. लाचेची पडताळणी दरम्यान कारागृह अधीक्षक भाईदास नामदेव ढोले यांनी वरील कामाकरिता तक्रारदाराकडून २५ हजार रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती  १५ हजार रु. लाच रक्कम स्वीकारली. यावरून आरोपी विरुद्ध आज १२ ऑक्टोबर रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अप क्र. ११२०/१८ कलम ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंध कायदा अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे  पोलीस अधीक्षक   पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार,  यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक डी.एम. घुगे, पोलीस निरीक्षक  सचिन म्हेत्रे,  पुरुषोत्तम चौबे, पोहवा मनोहर एकोणकर, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, सुभाष गोहोकर, पोशी रवींद्र ढेंगळे, समीक्षा भोंगळे व चापोशी राहुल ठाकरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी यशस्वी केली आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-12


Related Photos