महत्वाच्या बातम्या

 गोवा बनावटीच्या मद्य तस्करीचे धागेदोरे नाशिकपर्यंत : बनावट मद्यनिर्मिती कारखान्याचा उत्पादन शुल्क विभागाने केला पर्दाफाश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने आंतरजिल्हा मद्य तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका शेतातील टीनाच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट विदेशी मद्यनिर्मिती व बॉटलिंग कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने नंदोरी टोल नाका रोडवरील बोर्डा चौक परिसरात अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप आणि टाटा हॅरियर या दोन वाहनांवर कारवाई केली. यावेळी गोवा बनावटीच्या रॉयल स्टॅग ब्रँडच्या १८० मिलीच्या ७१ बॉक्समधील ३ हजार ४०८ बाटल्या, तसेच दोन लिटरच्या १७ बॉक्समधील १०२ बाटल्या असा एकूण ८८ बॉक्स मद्यसाठा जप्त करण्यात आला. या मद्यसाठ्याची किंमत ११ लाख ३८ हजार रुपये असून, दोन्ही वाहनांची किंमत २७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पहिल्या कारवाईत ३८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात टाटा हॅरियरचा चालक बादल महादेव विरुटकर (२६) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याची चौकशी केली असता जप्त करण्यात आलेला मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून आणल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे चंद्रपूर पथकाने २४ नोव्हेंबर रोजी पहाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील एका शेतातील टीनाच्या शेडवर छापा टाकला. तेथे बनावट विदेशी मद्य तयार करून त्याचे बॉटलिंग व पॅकिंग केले जात असल्याचे उघड झाले.

या कारवाईत रॉयल स्टॅग ब्रँडच्या १८० मिलीच्या १ हजार ९२० भरलेल्या बाटल्या, गोवा राज्यात निर्मित रॉयल इम्पॅक्ट ब्रँडच्या ७५० मिलीच्या १४४ भरलेल्या बाटल्या आणि रॉयल स्टॅगच्या १८० मिलीच्या १ हजार ६०० रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे ब्लेंड, दहा लिटर क्षमतेच्या ड्रममधील बनावट मद्य, छापील स्टिकर्स, रिकामे कागदी खोके, बाटल्यांची बुचे, लेबल, पॅकिंग साहित्य व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत ७ लाख ५३ हजार ४७० रुपये आहे. या ठिकाणाहून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

नाशिकमधील कारखान्यावरील कारवाईसाठी नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सी विभागासह विभागीय भरारी पथकाने सहकार्य केले. गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या जिल्ह्यात सुरू असलेला बनावट विदेशी मद्यनिर्मितीचा कारखाना शोधून काढण्यात चंद्रपूर पथकाला यश आले. या कारवाईमुळे बनावट विदेशी मद्य तयार करणे, त्याचे पॅकिंग करणे आणि विविध ठिकाणी त्याची अवैध वाहतूक करणे अशा आंतरजिल्हा साखळीचा पर्दाफाश झाला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, नागपूर विभाग गणेश पाटील आणि चंद्रपूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात निरीक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद राजोते, सागर धिडशे, हर्षराज इंगळे तसेच जवान किशोर डोंगरे, शुभम गोवारदिपे, मंगेश कुयटे, नितेश घाटे, किशोर पेदुजवार, जगदिश मस्के आणि वाहनचालक विलास महाकुलकर व प्रविकांत निमगडे यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.





  Print






Related Photos