गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : २१ मार्ग बंद, नदी - नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ११०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्या - नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील २१ मार्ग बंद झाले असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.
धरणांचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा -
पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे ४ व मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगितले आहे. आपत्कालीन यंत्रणांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
शाळांना सुट्टी; प्रशासन अलर्ट मोडमध्ये -
हवामान विभागाच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मासूलकसा घाट परिसरात दरड कोसळल्याने नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. दरम्यान, दगड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
बंद झालेले मार्ग (तालुकानिहाय) -
अर्जुनी मोरगाव तालुका :
वडेगाव–खोलदा, दिनकरनगर - करांडली, प्रतापगड - कडोली, प्रतापगड–रामनगर, इळदा - वडेगाव, रामपुरी पूल (नवेगावबांध परिसर) बोरी - मांडोखाल, कोरंबीटोला - मांडोखाल, सिलेझरी - येरंडी (विहीरगाव), बोंडगावदेवी - खांबी, चान्ना - बोंडगावदेवी
देवरी तालुका -
चिचेवडा - मुरदोली, डवकी - शिलापुर, गोटाबोडी - बोरगाव, शेडेपार रस्ता, निलज, घोनाडी, सिंगांडोह - रोपा नाला, ककोडी - चिलाटी नाला, परसोडी (चिचगड - देवरी रोड)
आमगाव तालुका -
किंडगीपार- जवरी, किंडगीपार - शिवनी, जामखारी - धावडीटोला, कालीमाटी - सुपलीपार, सुपलीपार पाटीलटोला - मोहगाव
शेती पाण्याखाली; शेतकऱ्यांची चिंता वाढली -
जिल्ह्यात २५ टक्के रोवणीचे काम पूर्ण झाले होते. मात्र गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी व तिरोडा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास रोवणी वाहून जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
गोंदिया शहरात पाणी साचले, वाहतूक ठप्प -
गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कचरा मोहल्ला परिसरातील अंडरग्राऊंड पुलाखाली गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. या परिस्थितीमुळे नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
प्रशासनाचे आवाहन : अफवांपासून सावध राहा -
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा कार्यरत असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.
News - Gondia




Petrol Price




