महत्वाच्या बातम्या

 कापूस उत्पादन अंदाजातील तफावत : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज जाहीर करणाऱ्या विविध संस्थांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून येत असून, त्याचा थेट परिणाम कापूस बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी दोन शासकीय, तीन व्यापारी आणि एक आंतरराष्ट्रीय संस्था टप्प्याटप्प्याने कापूस उत्पादनाचे अंदाज जाहीर करतात. मात्र हे अंदाज अनेकदा बाजारपेठेच्या वास्तवाशी विसंगत असल्याची टीका होत आहे.

कापड उद्योजक व व्यापारी संघटना एका विशिष्ट संस्थेच्या आकडेवारीचा आधार घेत केंद्र सरकारवर कापूस आयात वाढविणे आणि आयात शुल्क रद्द करण्यासाठी दबाव निर्माण करतात. सरकारने अशा मागण्यांना मान्यता दिल्यास देशांतर्गत बाजारात कापसाचे दर घसरतात आणि त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो.

१ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर हा कालावधी जागतिक स्तरावर कापूस वर्ष म्हणून ओळखला जातो. देशात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची कापूस उत्पादन व वापर समिती (सीओसीपीसी), कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्री (सीआयटीआय), ऑल इंडिया कॉटन ब्रोकर्स असोसिएशन (एआयसीबीए) तसेच अमेरिकन कृषी विभाग (यूएसडीए) या संस्था कापूस उत्पादनाचे अंदाज जाहीर करतात.

शासकीय संस्था पेरणी क्षेत्र, उपग्रह पाहणी, हवामान, रोगकिडींचा प्रादुर्भाव आणि पीक कापणी प्रयोगांच्या आधारे अंदाज नोंदवतात. तर व्यापारी संस्था बाजारातील आवक, जिनिंग-प्रेसिंग उद्योगांकडून तयार होणाऱ्या रुईच्या गाठी आणि व्यापार व्यवहारांचा आधार घेत उत्पादनाचा अंदाज जाहीर करतात.

यामध्ये सीएआयच्या अंदाजांना विशेष महत्त्व दिले जाते. मात्र या संस्थेचे अंदाज वारंवार बदलत असल्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. सीएआयने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये देशातील कापूस उत्पादन ३०२.२५ ते ३०५ लाख गाठी राहील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र एप्रिल-मे २०२६ मध्ये हा अंदाज वाढवून ३२४ लाख गाठींवर नेण्यात आला. त्यामुळे अंदाज प्रक्रियेतील अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२०२५-२६ या कापूस वर्षासाठी विविध संस्थांचे अंदाज देखील वेगवेगळे आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ३३५ ते ३३७ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. सीओसीपीसीने ३३० ते ३३५ लाख गाठी, सीआयटीआयने ३२२ ते ३२५ लाख गाठी, एआयसीबीएने ३१६ ते ३१७ लाख गाठी, तर यूएसडीएने ३१४ ते ३२० लाख गाठी उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी १०० लाख गाठी कापसाचे उत्पादन होत असतानाही सीएआयकडून केवळ ७८ ते ८५ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने शेतकरी व अभ्यासकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उत्पादन कमी असल्याचा आधार घेत कापूस आयात वाढविण्याची मागणी केली जाते.

मात्र उत्पादन जास्त असल्यास निर्यातीला प्रोत्साहन देण्याची किंवा सबसिडी देण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून होत नसल्याची टीका देखील होत आहे. दरवर्षी १५ ते २० लाख गाठी कापूस आयात करून सुमारे ३०० लाख गाठी कापसाच्या बाजारभावावर परिणाम घडवून आणला जात असल्याचा अनुभव बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

कापूस उत्पादन अंदाजातील ही तफावत आणि त्यावर आधारित निर्णयप्रक्रिया यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून, अंदाज पद्धती अधिक पारदर्शक व वस्तुनिष्ठ करण्याची गरज व्यक्त होत आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos