महत्वाच्या बातम्या

 मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची पळसगावला भेट : अभ्यासिका केंद्राची पाहणी, गाढवी नदीवर वनराई बंधारा


- विद्यार्थ्यांशी साधला संवाद, स्पर्धा परीक्षांसाठी केले मार्गदर्शन; जलसंधारण आणि वृक्षारोपणाच्या कामांचाही घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी पळसगाव येथे भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत सुरू असलेल्या अभ्यासिका केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व पटवून देत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कासवी-पळसगाव परिसरातील गाढवी नदीवर बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी करून जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेतला.

या दौऱ्यादरम्यान गडचिरोली मुख्यमंत्री फेलो जागृत पाटील, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मडावी, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी अशोक कुर्झेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज मडावी, पळसगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी पुरुषोत्तम बनपुरकर, ग्रामपंचायत अधिकारी कीर्ती सडमाके, पाथरगोटा ग्रामपंचायत अधिकारी प्रीती मसराम, कनिष्ठ अभियंता पूजा कोडापे, प्राचार्य हेमंत बोरकर आणि पत्रकार प्रवीण राहटे आदी उपस्थित होते.

अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद -
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या अभ्यासाची तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करावा, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि शिस्तबद्ध राहून निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्थानिक पातळीवर अभ्यासाची सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. पळसगाव येथील अभ्यासिका केंद्रात विद्यार्थी मोठ्या संख्येने अभ्यास करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अभ्यासिका केंद्रात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी सुहास गाडे म्हणाले, पळसगाव येथील अभ्यासिका केंद्रात विद्यार्थी मोठ्या संख्येने अभ्यास करत आहेत, ही अत्यंत चांगली बाब आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे विशेष लक्ष देऊन नियमित अभ्यास करावा. जिल्हा परिषदेकडून अभ्यासिका केंद्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

गाढवी नदीवरील वनराई बंधाऱ्याची पाहणी -
या भेटीदरम्यान कासवी-पळसगाव परिसरातील गाढवी नदीवर बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याचीही मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी पाहणी केली. या बंधाऱ्यामुळे नदीचे वाहते पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी करता येणार आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, भूजल पातळीत वाढ होण्यासही हातभार लागणार आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते.

संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पळसगाव ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. गाढवी नदीवरील वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. त्याचबरोबर अभ्यासिका केंद्र, वृक्षारोपण आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला गती मिळेल. या सर्व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश -
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीदरम्यान वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण, हरित गावाची निर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शिक्षण, स्वच्छता, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन या विविध क्षेत्रांतील कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला पळसगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थ, बालगोपाल सरस्वती विद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा पळसगावचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, उमेद अभियानातील महिला, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या या भेटीमुळे पळसगावातील शैक्षणिक सुविधा, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग आणि प्रशासकीय समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने या उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे.





  Print






Related Photos