महत्वाच्या बातम्या

 दिवाळीत घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बल्लारपूर पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


 

विदर्भ न्यूज एकंप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळीच्या सणानिमित्त अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जातात. याच संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष्य करण्याची शक्यता असते. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन बल्लारपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केले आहे.

घराच्या सुरक्षिततेसाठी मुख्य प्रवेशद्वारासह मागील दरवाजांनाही मजबूत दर्जेदार कुलूप लावावे. शक्य असल्यास मोशन डिटेक्टर अलार्म यंत्रणेचा वापर करावा. रात्रीच्या वेळी घराचा परिसर, मुख्य प्रवेशद्वार आणि पायऱ्यांच्या ठिकाणी पुरेशी रोषणाई ठेवावी. घराबाहेर वर्तमानपत्रे, दूध किंवा कुरिअर साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. घर बंद असताना बाहेर साचलेली पत्रे आणि वर्तमानपत्रे चोरट्यांना घरात कोणी नसल्याचा संकेत देऊ शकतात.

दीर्घकाळासाठी किंवा सलग काही दिवस बाहेरगावी जाणार असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा संबंधित बिट अंमलदारांना पूर्वकल्पना द्यावी. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड ठेवण्याऐवजी ती सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. तसेच घरात काम करणारे नोकर, वाहनचालक, माळी आणि भाडेकरू यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी. प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा दुरुस्तीच्या कामासाठी येणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित केल्यानंतरच त्यांना घरात प्रवेश द्यावा.

परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय आणीबाणी क्रमांक ११२ वर संपर्क साधावा. दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या घराच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केले आहे.





  Print






Related Photos