महत्वाच्या बातम्या

 मिशन लक्षवेधमधून भंडाऱ्याच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड


- गोळाफेकमध्ये जानवी तरोणे, तर उंच उडीत प्रतिभा उके करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मिशन लक्षवेध योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील दोन उदयोन्मुख खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र, भंडारा येथील जानवी तरोणे (गोळाफेक) आणि प्रतिभा उके (उंच उडी) या दोन खेळाडूंची १७ वर्षांखालील वयोगटातील शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील श्रीमंत माधवराव सिंधिया खेल परिसरात आयोजित करण्यात आली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्यामार्फत मिशन लक्षवेध योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या मैदानी क्रीडा प्रकारात या दोन्ही खेळाडूंना नियमित प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षक सुशांत बांडेबुचे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.

दोन्ही खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभागाचे उपसंचालक महादेव कसगावडे आणि भंडाऱ्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मिशन लक्षवेध योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होत आहेत. भंडारा जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करीत असून, या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली आहे. या केंद्रातून भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी व्यक्त केला.





  Print






Related Photos