कामगार कल्याण मंडळाच्या लोकनृत्य स्पर्धेत वर्धाच्या जोगवा नृत्याला प्रथम क्रमांक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागांतर्गत चंद्रपूर गट कार्यालयाच्या वतीने आयोजित गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र वर्धा येथील जोगवा नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. विविध लोककला आणि पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाने ही स्पर्धा रंगतदार ठरली.
२६ नोव्हेंबर २०२६ रोजी बंगाली कॅम्प येथील ललित कला भवनात ही स्पर्धा सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीकांत धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे आणि परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेत नगीनाबाग वसाहत, चंद्रपूर येथील आदिवासी नृत्याने द्वितीय, तर साईबाबा वसाहत, बल्लारपूर येथील गोंडी नृत्याने तृतीय क्रमांक मिळविला. विविध लोकनृत्यांच्या माध्यमातून कलाकारांनी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी नृत्यधारा कथक विद्यालयाच्या संचालिका व कथक विशारद पूनम सुभाष झा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सचिव देवराव कोंडेकर, ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम पान्हेरकर, कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे तसेच परीक्षक उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षण यामिनी सोरदे, संतोष पगारे आणि विजेंद्र दिलीप टेंभुर्णे यांनी केले. प्रास्ताविक रामेश्वर अळणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण उपरे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी चंद्रपूर गटातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




