महत्वाच्या बातम्या

 चामा दादर जंगलात नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश : ४ नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर तालुक्यातील चामा दादर जंगल परिसरात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांविरोधात शनिवारी (१४) सकाळपासून नक्षलविरोधी हॅक फोर्स व पोलिस दलाने संयुक्त सर्च ऑपरेशन राबवले. या मोहिमेदरम्यान दुपारी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून, यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष नक्षलवाद्याचा समावेश आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आली सर्च मोहीम -
हॅक फोर्सला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चामा दादरच्या घनदाट जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याचे उघड झाले. त्यानंतर बालाघाट पोलिस आणि हॅक फोर्सच्या संयुक्त पथकाने शनिवारी पहाटेपासून जंगल परिसरात सर्च मोहीम सुरू केली. तपास मोहिमेच्या दरम्यान दुपारच्या सुमारास सशस्त्र नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत चकमकीला सामोरे गेले.

पंधरा-वीस मिनिटांची चकमक ; ४ नक्षलवादी ठार -
दोन्ही बाजूंनी सुमारे १५ ते २० मिनिटे गोळीबार झाला. या कारवाईत तीन महिला आणि एक पुरुष नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहितीही पुढे येत आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती बालाघाटचे पोलिस अधीक्षक यांनी दिली आहे.

शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा साठा जप्त -
ही कारवाई केवळ नक्षलवाद्यांच्या निर्मूलनापुरती मर्यादित राहिली नाही, तर घटनास्थळावरून रॉकेट लाँचर, विविध प्रकारची शस्त्रे, स्फोटके व नक्षली साहित्य जप्त करण्यात आले. या सर्च ऑपरेशनमुळे नक्षलवाद्यांची मोठी कारवाई उधळली गेल्याचे संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री मोहन यादव यांचा दुजोरा -
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रविवारी याबाबत ट्विटरवरून अधिकृत प्रतिक्रिया देत चकमकीला दुजोरा दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त मध्यप्रदेश करण्याचे ध्येय ठेवले आहे. या दिशेने सुरू असलेल्या मोहिमेला हे मोठे यश मिळाले आहे.

यशस्वी पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार - 
या यशस्वी मोहिमेत सहभाग घेतलेल्या पोलिस आणि हॅक फोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मध्यप्रदेश सरकारतर्फे लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos