गडचिरोलीतील फुटपाथ धारकांचे योग्य पुनर्वसन करा : पर्यायी जागा उपलब्ध करून द्या!


- सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे फुटपाथधारकांची मागणी; रोजगार हिरावून न घेता विकास करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून फुटपाथवर छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब व्यावसायिकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे करण्यात आली आहे.
गडचिरोली शहरात अनेक छोटे व्यावसायिक वर्षानुवर्षे फुटपाथवर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अचानक करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी या गरीब व्यावसायिकांच्या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक होते, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
शहरातील उपलब्ध शासकीय तसेच महसूल विभागाच्या जागांचा शोध घेऊन या फुटपाथधारकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांचे योग्य नियोजन करून पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहराचा विकास आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत होणे आवश्यक आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली गोरगरीब व्यावसायिकांचा रोजगार हिरावून घेणे योग्य नाही. विकासाला विरोध नसून, विकासासोबतच सामान्य नागरिकांच्या रोजगाराचाही विचार झाला पाहिजे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन फुटपाथधारकांना न्याय द्यावा आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




