महाकाली मंदिर विकासाचा एकही रुपया इतरत्र वळवू देणार नाही : ७५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करा!


- आ. किशोर जोरगेवार यांचे प्रशासनाला निर्देश; पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार विकासकामे मार्गी लावण्याचे आदेश
- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक; भक्त निवास, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि पार्किंगसह भाविकांच्या सुविधांवर भर; यात्रा परिसरातील दोन भव्य पाण्याच्या टाक्यांवरून पुरातत्त्व विभागाला सवाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता महाकाली मंदिर परिसर आणि यात्रा परिसराच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेल्या ५९ कोटी रुपयांच्या निधीतील एकही रुपया इतरत्र वळवू देणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियम व अटींचे पालन करून ७५ कोटी रुपयांचा सुधारित विकास आराखडा तयार करावा आणि विकासकामे प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी भक्त निवास आणि अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत वीस कलमी सभागृहात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माता महाकाली मंदिर परिसर विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, यात्रा परिसराचा नियोजनबद्ध विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवासाची निर्मिती तसेच चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगळू कुंभार, महानगरपालिका आयुक्त नरेश अकुनुरी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक जगताप, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रशांत सोनवने उपस्थित होते. याशिवाय भाजपचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, सविता दंढारे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, नगरसेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी, आशा देशमुख, ऋषभ दुपारे, संजय बुरघाटे, अजय वैरागडे, सुधीर कारंगल आदींची उपस्थिती होती.
दोनदा आराखडा तयार, तरी विकासकामांना मुहूर्त मिळेना! -
माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या विकासकामांसाठी यापूर्वी दोन वेळा आराखडा तयार करण्यात आला. तरीही पुरातत्त्व विभागाच्या नियम, अटी आणि तांत्रिक निकषांमध्ये हे आराखडे बसत नसल्याने विकासकामांची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. परिणामी, निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष विकासकामे रखडली आहेत.
ही बाब लक्षात घेता आता पुन्हा नव्याने सुधारित आराखडा तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, माता महाकाली हे केवळ चंद्रपूरकरांचेच नव्हे, तर संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रोत्सव आणि महाकाली यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होते. अशा महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळाचा नियोजनबद्ध विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने यासाठी निधी मंजूर केला असताना केवळ आराखड्यातील तांत्रिक अडचणींमुळे विकासकामे रखडणे योग्य नाही.
पुरातत्त्व विभागाच्या नियमांत बसणारा ७५ कोटींचा आराखडा तयार करा -
पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा पूर्ण आदर राखूनच मंदिर परिसराचा विकास करण्यात यावा, ही आमची भूमिका आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक सूचनांची माहिती घ्यावी. त्यानुसार नियमांच्या चौकटीत बसणारा, मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाला साजेसा आणि भाविकांच्या सर्व गरजा लक्षात घेणारा उत्कृष्ट ७५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार करावा, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले. केवळ कागदोपत्री आराखडे तयार करण्यापेक्षा विकासकामे प्रत्यक्षात सुरू होतील, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण कराव्यात. सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भक्त निवासासह भाविकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य -
महाकाली मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ दर्शनाची सुविधा मिळणे पुरेसे नाही, तर त्यांचा संपूर्ण प्रवास सुखकर आणि सोयीस्कर झाला पाहिजे. राज्याच्या विविध भागांतून तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामाची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भक्त निवास उभारण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशी भूमिका आमदार जोरगेवार यांनी मांडली. याशिवाय स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रशस्त परिसर, बैठक व्यवस्था, वाहनतळ, स्वच्छता आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात यावा. विशेषतः दूरवरून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी आल्यानंतर मुक्कामाची चांगली सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयी-सुविधांचा सर्वंकष विचार करूनच विकास आराखडा तयार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
मंदिर परिसरालगतची जागा निश्चित करण्याचे निर्देश -
विकासकामांसाठी आवश्यक जागेचा प्रश्नही बैठकीत महत्त्वाचा ठरला. महाकाली मंदिराच्या जवळपास उपलब्ध असलेली योग्य जागा महसूल विभागाने निश्चित करावी, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या. विकासकामांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासोबतच संबंधित विभागांच्या परवानग्या आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. यात्रा परिसरात दोन भव्य पाण्याच्या टाक्या उभ्या राहताना पुरातत्त्व विभागाचे लक्ष कुठे होते? महाकाली मंदिर परिसराच्या विकासात पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा मुद्दा उपस्थित केला जात असताना याच आरक्षित यात्रा परिसरात यापूर्वी उभारण्यात आलेल्या दोन भव्य पाण्याच्या टाक्यांचा मुद्दाही आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला.
यात्रा परिसरात दोन मोठ्या पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आली, त्यावेळी पुरातत्त्व विभागाची भूमिका काय होती? त्या बांधकामांच्या वेळी विभागाला आपल्या नियमांची आणि अटींची आठवण झाली नव्हती का? मग भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या विकासकामांच्या वेळीच तांत्रिक अडचणींचा प्रश्न का निर्माण होतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंदिर परिसरातील विकासकामे करताना पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. मात्र, नियमांची अंमलबजावणी करताना सर्व कामांसाठी एकसमान निकष असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यापूर्वी झालेल्या बांधकामांबाबत आणि प्रस्तावित विकासकामांबाबत समान निकषांच्या आधारे निर्णय घेतला गेला पाहिजे. भाविकांच्या सुविधांसाठी मंजूर झालेला निधी केवळ तांत्रिक अडचणींमुळे पडून राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धार्मिक पर्यटनातून चंद्रपूरच्या अर्थव्यवस्थेला बळ -
माता महाकाली मंदिर हे चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे महत्त्वाचे केंद्र आहे. या मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्यास भाविकांना दर्जेदार सुविधा मिळण्यासोबतच चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागांतून अधिकाधिक भाविक चंद्रपूरला भेट देतील. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक, छोटे दुकानदार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक क्षेत्र आणि इतर पूरक व्यवसायांना फायदा होईल. रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे महाकाली मंदिर परिसराचा विकास हा केवळ एका धार्मिक स्थळाच्या सुशोभीकरणापुरता मर्यादित नसून चंद्रपूरच्या पर्यटन विकासाशी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला महत्त्वाचा विषय आहे. दूरदृष्टी ठेवून या परिसराचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
निधी वळविण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही! -
माता महाकाली मंदिर आणि यात्रा परिसराच्या विकासासाठी मंजूर झालेला ५९ कोटी रुपयांचा निधी याच विकासकामांसाठी खर्च झाला पाहिजे. या निधीतील एकही रुपया अन्य कामासाठी वळविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, यात्रा परिसराचा नियोजनबद्ध विकास करणे आणि चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणे, हा या निधीमागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला साजेसा तसेच भाविकांच्या हिताचा सुधारित आराखडा तयार करून विकासकामे प्रत्यक्षात सुरू करावीत. मंजूर निधीचा योग्य विनियोग होऊन प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होईपर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले. माता महाकाली मंदिर परिसराचा विकास हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा, चंद्रपूरच्या अस्मितेचा आणि शहराच्या पर्यटन विकासाचा विषय आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असताना विकासकामे रखडू नयेत, पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे पालन करून आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात आणि महाकाली मंदिर परिसराला सर्वांगीण विकासाचे नवे स्वरूप मिळावे, यासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलावीत, असा ठाम संदेश या बैठकीतून आमदार जोरगेवार यांनी दिला.




Petrol Price




