महत्वाच्या बातम्या

 चुरचुरा चक परिसरात रानटी हत्तींचा धुमाकूळ : धानपिकांसह पुंजण्यांची नासधूस


- मळणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मागील आठवड्यात पोर्ला वनपरिक्षेत्रात पुन्हा दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने चुरचुरा चक परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तीन दिवसांपूर्वीच या कळपाने दिभना-अमिर्झा मार्गालगतच्या शेतांमधील कापणीला आलेल्या धानपिकाची नासधूस केली होती. त्यानंतर आता पुन्हा हा कळप चुरचुरा चक परिसरात दाखल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

सध्या या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक कापणीला आले आहे, तर काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून शेतात पुंजणे उभारली आहेत. येत्या काही दिवसांत मळणीचे नियोजन असतानाच हत्तींच्या कळपाकडून उभ्या पिकाची तसेच कापणी करून ठेवलेल्या धानपुंजण्यांची नासधूस केली जात आहे. हत्तींचा कळप धानाची पुंजणे उपसून फेकत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वर्षभराची मेहनत आणि शेतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

मळणीच्या तोंडावर धानपुंजण्यांची नासधूस -
धान कापणीनंतर मळणीसाठी शेतात सुरक्षित ठेवलेल्या पुंजण्यांनाच हत्तींकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान मोठे असताना वनविभागाकडून मिळणारी भरपाई मात्र तुटपुंजी असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

वनविभागाकडून पूर्वसूचनेचा अभाव; शेतकऱ्यांचा आरोप -
चुरचुरा परिसरात रानटी हत्तींचा सातत्याने वावर सुरू असल्याने हा परिसर संवेदनशील बनला आहे. अशा परिस्थितीत हत्तींच्या कळपाच्या हालचालींची माहिती वनविभागाने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना वेळेत देणे आवश्यक आहे. दवंडीच्या माध्यमातून पूर्वसूचना मिळाल्यास शेतकऱ्यांना सतर्क राहता येईल आणि संभाव्य पीकनुकसान तसेच जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी घेता येईल. मात्र, स्थानिक वनपाल आणि वनरक्षकांकडून दवंडी देऊन ग्रामस्थांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

तसेच पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हत्तींचा वावर सातत्याने असतानाही वनविभागाकडून प्रभावी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवून गावोगावी पूर्वसूचना द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी आणि हत्तींच्या उपद्रवावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.





  Print






Related Photos