महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरमध्ये ५४ वे तालुकास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासह संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग, पंचायत समिती बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ५४ वे तालुकास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान भालेराव पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्प आणि प्रतिकृती सादर करून आपल्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले.

या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी २६ प्रतिकृती, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी १७ प्रतिकृती सादर केल्या. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सीडब्ल्यूएसएन गटातून सात प्रकल्प, आदिवासी गटातून दोन प्रकल्प सादर करण्यात आले. शिक्षक व परिचर गटातूनही विज्ञान प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देण्यासाठी प्रदर्शनासोबतच वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती बल्लारपूरचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे होते, तर भालेराव पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा भास्करवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी यांच्या मार्गदर्शनाखाली या विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी शिक्षण सोबतकौर भोंड (बीट कोठारी), नागेंद्र कुमरे (बीट विसापूर), केंद्रप्रमुख किरण कामडी (केंद्र कोठारी), गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, शिक्षकवृंद तसेच पंचायत समिती बल्लारपूर अंतर्गत विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रदर्शनात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची कल्पकता, निरीक्षणक्षमता आणि वैज्ञानिक विषयांतील रुची अधोरेखित झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासोबतच संशोधन, प्रयोगशीलता आणि नव्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया वाठोरे यांनी केले, तर रूपाली मामीडवार यांनी आभार प्रदर्शन केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला असून, त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरला.





  Print






Related Photos