बल्लारपुरात दोन गटांत तुफान राडा : लोखंडी रॉड व काठ्यांनी एकमेकांवर हल्ला, ८ तरुणांना अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर येथील पॉवर हाऊस परिसरात झालेल्या जुन्या वादातून दोन गटांत निर्माण झालेल्या तणावाचे पर्यवसान गोकुळनगर येथील बौद्ध विहारासमोर तुफान हाणामारीत झाले. १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. या मारहाणीत अनेक तरुण जखमी झाले असून, एका तरुणाच्या डोक्याला तीन टाके पडले, तर दुसऱ्या गटातील जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आठ तरुणांना अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत.
पुनीत प्रकाश देशकर २० वर्षे रा. गोकुळनगर, बल्लारपूर याच्या तक्रारीवरून बॉबी ऊर्फ अनिष अजय मेश्राम, अमन कैतवास, शुभम रागीट, करण साव, रोहित साव आणि दादू पेटकर यांच्याविरुद्ध, तर बॉबी ऊर्फ अनिष अजय मेश्राम २० वर्षे रा. विद्यानगर, बल्लारपूर याच्या तक्रारीवरून पुनीत देशकर, दीपक शर्मा, अनिकेत मेश्राम, आकाश घुगलोत आणि विरू घुगलोत यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पुनीत देशकर आणि त्याचा मित्र दीपक शर्मा हे विसापूर येथील पॉवर हाऊस परिसरात गेले होते. त्यावेळी विरू घुगलोत हा एका तरुणाला मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. पुढे जिममध्ये असताना पुनीतला फोन करून त्याच्याकडे झालेल्या भांडणाबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी अमन कैथवास आणि देव बानोत यांच्या माध्यमातून फोनवरून वादही झाला होता.
रात्री साडेनऊच्या सुमारास पुनीत देशकर हा आपला भाऊ आणि मित्रांसह गोकुळनगर येथील बौद्ध विहारासमोर नगर परिषदेने लावलेल्या सिमेंटच्या बाकड्यांवर बसला होता. त्याचवेळी बॉबी मेश्राम, अमन कैथवास, शुभम रागीट, करण साव, रोहित साव आणि दादू पेटकर हे कार व दुचाकींनी तेथे आले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि काठ्या होत्या. पॉवर हाऊस परिसरातील घटनेवरून पुनीतला लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पुनीतच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी रॉडचा मार लागला. त्याला बल्लारपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी डोक्याला तीन टाके घातले.
दुसरीकडे, बॉबी मेश्राम याने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी तो करण साव आणि अनिकेत पाटील यांच्यासोबत विसापूर पॉवर हाऊस परिसरातील मैदानात गेला होता. तेथे विरू घुगलोत आणि आकाश घुगलोत यांनी करण साव याला जुन्या वादातून मारहाण केली. त्यानंतर करणने आपल्या मित्रांना बोलावले. पुढे सर्वजण गोकुळनगर येथील बौद्ध विहार परिसरात पोहोचले. तेथे पुनीत आणि अमन यांच्यात वाद सुरू असताना अचानक दोन्ही गटांत हाणामारी झाली. यावेळी पुनीत आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप बॉबीने केला आहे.
या हल्ल्यात अमन कैतवास आणि करण साव जखमी झाले. अमन आणि करण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, करणला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, परस्परविरोधी तक्रारींवरून बल्लारपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात आठ तरुणांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहेत.




Petrol Price




