ग्रामीण युवकांनी खेळासोबतच गावाच्या विकासासाठीही पुढाकार घ्यावा : डॉ. प्रणय खुणे


- गुरुनोली येथे भव्य नाईट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन; जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील संघांचा उत्स्फूर्त सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : ग्रामीण भागातील युवकांनी केवळ खेळापुरते मर्यादित न राहता खेळाच्या माध्यमातून गावाचा विकास कसा साधता येईल, याचाही विचार करावा. युवकांनी व्यसनमुक्त जीवन जगून गावात चांगले सामाजिक उपक्रम राबवावेत आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले.
कुरखेडा तालुक्यातील गुरुनोली येथे युवाशक्ती क्रीडा मंडळ, गुरुनोली यांच्या वतीने आयोजित भव्य नाईट कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कबड्डी क्लब आणि संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. पद्मश्री डॉ. परशुराम खुणे हे सहउद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे होते.
यावेळी माजी सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे, सुदाम पाटील खुणे, गंगाधर सयाम, पोलीस पाटील, संदीप खुणे, महेश पाटील खुणे, देवानंद पाटील खुणे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मुख्य सल्लागार, नितेश खुणे, विलास वट्टी, दिलीप कन्नमवार, कोडाप सर, भागवत चौधरी आणि सोहम शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी आमदार कृष्णा भाऊ गजबे आणि सहउद्घाटक पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. तसेच युवकांमध्ये संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. खेळामुळे युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते. मात्र, त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गावात स्वच्छता, शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि इतर विधायक उपक्रम राबविण्यासाठीही युवकांनी संघटित व्हावे. खेळाच्या माध्यमातून गावाची ओळख निर्माण करण्यासोबतच गावाच्या विकासातही योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युवाशक्ती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध उपेंडी, उपाध्यक्ष आकाश काटेगे, प्रणय किरंगे, सचिन किरंगे, कौशिक तुलावी, सचिन सोनवणे, दुष्यंत कांबळे तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




Petrol Price




