बल्लारपूरात ६२४ किलो प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे जप्त : १७.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याची अवैध वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार बल्लारपूर येथे उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने बामणी-राजुरा मार्गावरील सीमापुरी ट्रान्सपोर्टसमोर छापा टाकून ६२४ किलो संशयित एचटीबीटी कापूस बियाणे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकूण १७ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील वाहनचालक राजू रामडू बाशापोषु (४५) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) तथा बियाणे निरीक्षक पल्लवी संपत गोडबोले यांनी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बामणी-राजुरा मार्गावरील सीमापुरी ट्रान्सपोर्टसमोर एपी ३९ टीजी २१२७ क्रमांकाच्या वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली.
यावेळी वाहनात खाकी रंगाची १४ पोती आढळून आली. पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित प्रतिबंधित एचटीबीटी हायब्रीड कापूस बियाणे असल्याचे निदर्शनास आले. वाहनचालक राजू बाशापोषु याच्याकडे बियाण्याच्या वाहतुकीसंदर्भातील बिल्टी, वाहतूक पावती आणि डिलिव्हरी चलनाची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. चौकशीदरम्यान त्याने कर्नूल येथील धनलक्ष्मी सीडचे सीताराम साहेब यांच्या सांगण्यावरून बामणी परिसरात वाहन उभे केले होते. त्यानंतर तीन व्यक्तींनी टेम्पोतून आणलेली १४ पोती आपल्या वाहनात भरून घटनास्थळी वाहन उभे करण्यास सांगितल्याची माहिती दिली.
कृषी विभागाच्या पथकाने संशय बळावल्याने एका पोत्यातील बियाण्याची तपासणी केली. यावेळी ते संशयित एचटीबीटी हायब्रीड कापूस बियाणे असल्याचे आढळले. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक श्रावण बोधे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून १४ पोत्यांतील एकूण ६२४ किलो बियाणे जप्त करण्यात आले. प्रतिकिलो दोन हजार रुपये याप्रमाणे बियाण्याची किंमत १२ लाख ४८ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची अंदाजे किंमत पाच लाख रुपये आहे. असा एकूण १७ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त बियाण्यांमधून दोन किलो नमुना घेऊन तो सीलबंद करण्यात आला असून, प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांच्या पोत्यांवर उत्पादकाचे नाव व पत्ता, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, तपासणी दिनांक, पॅकिंग दिनांक, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटीची मान्यता आणि विक्रीदर यांसारखी आवश्यक माहिती नमूद नसल्याचे आढळून आले. तसेच बियाण्याच्या साठवणुकीसाठी, वाहतुकीसाठी आणि विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८, महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा, वितरण व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन अधिनियम २००९ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी लोकेश कात्रे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्रावण बोधे, तालुका कृषी अधिकारी अजय पवार आणि कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) पल्लवी संपत गोडबोले यांनी केले.




Petrol Price




