महत्वाच्या बातम्या

 शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ : नऊ शेतकऱ्यांचे ६७ हजारांचे स्प्रिंकलर लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेंबळ आणि करंगवान शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नऊ शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी देण्यासाठी लावलेले स्प्रिंकलर चोरून नेले. १४ ते १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या चोरीच्या घटनेत एकूण ६७ हजार ५०० रुपयांचे स्प्रिंकलर चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेंबळ येथील विठ्ठल लटारी घागी (५२) यांच्या मालकीची शेतशिवारात दहा एकर शेती असून त्यांनी हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी जैन कंपनीचे आठ स्प्रिंकलर लावले होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ते शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना स्प्रिंकलर गायब असल्याचे दिसून आले. पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी आठ स्प्रिंकलर चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी केवळ एका शेतकऱ्याला लक्ष्य न करता परिसरातील अन्य आठ शेतकऱ्यांच्या शेतातही चोरी केली. निलेश देवराव मिलमिले यांचे सहा, सुभाष सखाराम भेंडाळे यांचे सात, महादेव पांडुरंग जिवतोडे यांचे १२, भगवान निळकंठ पारोधे यांचे १०, संदीप विकास कष्टी यांचे १४, रामदास पांडुरंग गाडगे यांचे ११, यादव दत्तू पारोधे यांचे सात, भारत दशरथ बदकी यांचे १२ स्प्रिंकलर चोरून नेण्यात आले. तसेच करंगवान शेतशिवारातील सुरेश सिताराम पायधन यांच्या शेतातील स्प्रिंकलर नोजल व पाईपसह चोरीला गेले.

शेतातील सिंचनासाठी आवश्यक असलेले साहित्यच चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरीमुळे नऊ शेतकऱ्यांचे एकूण ६७ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी विठ्ठल घागी यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकर करीत आहेत.





  Print






Related Photos