कान्हाळगाव अभयारण्य रद्द करू नका : व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करा – प्रा. सुरेश चोपणे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कान्हाळगाव वन्यजीव अभयारण्य रद्द करण्याऐवजी त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करून परिसरातील गावांच्या विकासाला चालना द्यावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष तथा केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या वन समितीचे माजी सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री आणि केंद्रीय वन मंत्रालयाकडे निवेदन सादर केले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणातील कवल व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा कान्हाळगाव परिसर वाघांसह अन्य वन्यजीवांच्या भ्रमणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसराचे वन्यजीव संवर्धन आणि स्थानिक गावांच्या विकासातील महत्त्व लक्षात घेऊन २०१४-१५ मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांकडे कान्हाळगाव येथे अभयारण्य घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर १५ मार्च २०२१ रोजी २६९.४० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या कान्हाळगाव वन्यजीव अभयारण्याला मान्यता मिळाली. महाराष्ट्रातील हे ५० वे वन्यजीव अभयारण्य ठरले.
मात्र, सध्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हे अभयारण्य रद्द करण्याची मागणी केल्याने प्रा. चोपणे यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. अभयारण्य रद्द करण्याऐवजी त्याचा व्याघ्र प्रकल्प म्हणून विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.कान्हाळगावचा परिसर भौगोलिक, पर्यावरणीय आणि वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. येथे बारमाही पाण्याचे झरे, सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वीचे लाकडाचे जीवाश्म, वृक्षांच्या महत्त्वपूर्ण प्रजाती, सुमारे २० वाघ आणि शेकडो वन्यजीव प्रजाती आढळतात. या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिक तरुणांना रोजगार, व्यवसाय आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
चंद्रपूर जिल्ह्यात एकेकाळी सुमारे ५२ टक्के असलेले वनक्षेत्र आता घटून जवळपास ३० टक्क्यांवर आले आहे. अशा परिस्थितीत उर्वरित जंगलांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. कान्हाळगाव परिसरात काही खाणींचे प्रस्ताव असून, यापूर्वी विमानतळाचाही प्रस्ताव चर्चेत होता. त्यामुळे या महत्त्वपूर्ण वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी आणि पर्यावरण संस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.




Petrol Price




