कृष्णनगरातील केरला कॉलनीत आढळला आणखी एकजण कोरोना पॉझिटीव्ह : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली ४८ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णनगरातील केरला कॉलनी परिसरात आज सोमवारी २५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या २५ वर्षीय बाधिताला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनासोबतच व्यक्तीगतरित्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी झाली की नाही याकडे प्रत्येकाने लक्ष वेधण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथून चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या युवकाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. काल लक्षणे दिसायला लागल्यावर त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटीव्ह आला. काल चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. तर ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला होता. आज सोमवारी एक व काल रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ झाली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे आरोग्य संदर्भातील माहिती गोळा होण्यास मदत होणार आहे. आजाराची जोखीम असणाऱ्या नागरिकांची ही नोंद होणे भविष्यातील कोणत्याही उद्रेकाचासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३ अतिसंवेदनशील भाग सध्या कार्यान्वित करण्यात आले होते. त्यापैकी १३ कंटेनमेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. १० कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहेत. एकूण २३ कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची प्राथमिक माहिती या काळात जमा करण्यात आली आहे. लक्षणे दिसणाऱ्या ५५ लोकांची तपासणी करण्यात आली असून सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या जवळपास सर्व रुग्णांची प्रवासा संदर्भातील माहिती गोळा करण्यात आली आहे. बहुतेक रुग्ण हे बाहेर जाऊन आलेले आहेत. तर अनेक जण त्यांच्या संपर्कातील आहे.त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद झाली पाहिजे.त्याच्याकडे व्यवस्था असेल तर होम कॉरेन्टाइन केले जाते. अन्यथा जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक अलगीकरणाची योग्य व्यवस्था केली असून नागरिकांनी व्यवस्थेबाबत आश्वस्त असावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. केवळ काही दिवसांचा त्रास म्हणून अनेक जण आपल्या प्रवासाची माहिती लपवीत असल्याचे पुढे आले आहे. मात्र यामुळे जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीने माहिती लपविणाऱ्यावर समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी लक्ष ठेवण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत १२ बाधित आढळले आहे. तर बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मूल, भद्रावती, ब्रम्हपुरी, कोरपना, नागभीड या तालुक्यांच्या ठिकाणांवर आतापर्यंत ९ बाधित आढळले आहेत. ग्रामीण भागात चंद्रपूर तालुक्यात ६, बल्लारपूर तालुक्यात २, पोंभुर्णामध्ये १, सिंदेवाहीमध्ये २, मुलमध्ये ३, ब्रम्हपुरीमध्ये १०, तर नागभीड तालुक्यातील ३ बाधित आतापर्यंत आढळून आले आहेत. एक बाधित जिल्ह्याबाहेरील आहे. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत २ मे (एक बाधित), १३ मे (एक बाधित), २० मे (एकूण १० बाधित), २३ मे (एकूण ७ बाधित), २४ मे (एकूण बाधित २ ), २५ मे (एक बाधित ), ३१ मे (एक बाधित ), २ जून (एक बाधित), ४ जून (दोन बाधित), ५ जून (एक बाधित), ६ जून (एक बाधित), ७ जून (एकूण ११ बाधित ), ९ जून (एकूण ३ बाधित ), १० जून (एक बाधित), १३ जून (एक बाधित), १४ जून (एकूण ३ बाधित ) आणि १५ जून (एक बाधित) अशाप्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४८ झाले आहेत. आतापर्यंत २५ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४८ पैकी ॲक्टीव्ह बाधितांची संख्या आता २३ झाली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-15


Related Photos