१.९० कोटींच्या कर्जाचे बनावट मंजुरीपत्र दाखवून हॉटेल व्यावसायिकाची ६.३० लाखांची फसवणूक


- कर्जाच्या कागदपत्रांच्या नावाखाली बँक ऑफ बडोदाचे दोन धनादेश घेतले; जालन्यातील दोघांविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : हॉटेल व्यवसायासाठी १ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे बनावट पत्र दाखवून वर्धेतील एका हॉटेल व्यावसायिकाची ६ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेचे कारण सांगून व्यावसायिकाकडून बँक ऑफ बडोदाचे दोन धनादेश घेण्यात आले. त्यानंतर या धनादेशांचा गैरवापर करून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी जालना येथील दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिल पुरुषोत्तम कावळे (५१, रा. बॅचलर रोड, वर्धा) असे फसवणूक झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. तर शिवकुमार आणि विलास राखे (दोघेही रा. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवकुमार याने अनिल कावळे यांना १ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यासंबंधीचे बनावट मंजुरीपत्रही त्यांना दाखविले. कर्ज मिळणार असल्याच्या विश्वासाने कावळे यांनी आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या नावाखाली शिवकुमार याने त्यांच्याकडून बँक ऑफ बडोदाचे दोन धनादेश घेतले.
मात्र, आरोपीने या धनादेशांचा गैरवापर करीत जालना येथील सहआरोपी विलास राखे याच्या माध्यमातून कावळे यांच्या बँक खात्यातून परस्पर ६ लाख ३० हजार रुपये काढून घेतले. खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर कावळे यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर अनिल कावळे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिवकुमार आणि विलास राखे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.




Petrol Price




