अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर


- भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला राहणार उपस्थित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला ते प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार, मंत्री नरहरी झिरवाळ यांचे रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आगमन होणार आहे. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहणार आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारसा यांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, उद्घाटन समारंभातील उपस्थितीनंतर मंत्री नरहरी झिरवाळ हे त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करणार आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या या जिल्हा दौऱ्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.




Petrol Price




