बिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / ब्रह्मपुरी :
तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील आठ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली. लगेच गावकरी धावल्याने मुलीचे प्राण वाचले.ऐश्वर्या राजेश्वर अलोणे असे बालिकेचे नाव आहे.  
  राजेश्वर अलोणे व मुलगी ऐश्वर्या जेवणानंतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने घराच्या अंगणात उभे होते. त्याचवेळी अंधारात घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने ऐश्वर्यावर हल्ला करीत ऐश्वर्याची मान जबड्यात पकडली. त्याच वेळी राजेश्वरने बिबट्याचा मागचा पाय पकडून मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केली व क्षणात गावातील लोक गोळा झाले. अखेर बिबट्याने जवळपास ३०० मीटर अंतरावर ऐश्वर्याला सोडले व जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. क्षणाचाही विलंब न लावता राजेश्वरने गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत ऐश्वर्याला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारीदेखील ग्रामीण रुग्णालयात आले. ऐश्वर्याच्या जखमांवर उपचार करण्यात आला. तिची प्रकृती आता चिंताजनक आहे. मात्र एकाच आठवड्यात परिसरात दोनदा बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-01


Related Photos