पोलिस व वनविभागाची संयुक्त एकता दौड : राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश!


- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजन; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून तळेगाव येथे पोलिस विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. पोलिस व वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकतेचा संकल्प केला.
या एकता दौडची सुरुवात तळेगाव येथील उड्डाणपुलावरून करण्यात आली. यावेळी पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही दौड काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात मार्गक्रमण करीत ही दौड नौन भाजी येथील परफॉर्मन्स सेंटरच्या पटांगणावर पोहोचून संपन्न झाली.
राष्ट्रीय एकतेचा घेतला संकल्प -
एकता दौडच्या समारोपानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
आरोग्य आणि योगाचेही दिले महत्त्व -
या कार्यक्रमादरम्यान पोलिस उपनिरीक्षक शेंडे यांनी उपस्थित वनकर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. दैनंदिन कामकाजातील धावपळ आणि ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगाभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून उपस्थित कर्मचाऱ्यांना योगाचे धडेही दिले.
राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून केवळ एकात्मतेचाच नव्हे, तर आरोग्यविषयक जागरूकतेचाही संदेश देण्यात आला. पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त सहभागामुळे दोन्ही विभागांतील समन्वय आणि सहकार्याचे दर्शन घडले. या कार्यक्रमाला ठाणेदार मंगेश भोयर, तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. बी. लांबाडे, पोलिस उपनिरीक्षक शेंडे यांच्यासह पोलिस विभाग आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Petrol Price




